५१ व्या ग्रंथभेट योजनेसाठी १,१८३ ग्रंथांची निवड : यादी प्रसिद्ध


- सूचना व हरकती नोंदविण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत; मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांतील ग्रंथांचा समावेश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता आणि महाराष्ट्र राज्य शासन यांच्या संयुक्त निधीतून राबविण्यात येणाऱ्या ५१ व्या ग्रंथभेट योजनेसाठी निवडण्यात आलेल्या १,१८३ ग्रंथांची यादी ग्रंथालय संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीबाबत सूचना, हरकती किंवा आक्षेप नोंदविण्यासाठी ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित लेखक, प्रकाशक आणि इतर इच्छुकांनी यादीचे अवलोकन करून काही त्रुटी किंवा दुरुस्ती आढळल्यास विहित मुदतीत लेखी स्वरूपात कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सन २०२४ मध्ये प्रकाशित झालेल्या आणि ग्रंथालय संचालनालयाला प्राप्त झालेल्या ग्रंथांमधून या योजनेसाठी ग्रंथांची निवड करण्यात आली आहे. राज्य ग्रंथालय नियोजन समितीच्या उपसमिती सदस्यांनी निवड प्रक्रिया राबवून विविध भाषांतील ग्रंथांची यादी निश्चित केली आहे.
मराठीतील ६८५ ग्रंथांचा समावेश -
५१ व्या ग्रंथभेट योजनेसाठी निवडलेल्या एकूण १,१८३ ग्रंथांमध्ये मराठी भाषेतील ६८५, हिंदी भाषेतील २४६ आणि इंग्रजी भाषेतील २५२ ग्रंथांचा समावेश आहे. ही यादी १६ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ग्रंथालय संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ग्रंथांच्या तपशिलात दुरुस्तीची संधी -
प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीतील कोणत्याही ग्रंथाबाबत सूचना, हरकती किंवा आक्षेप असल्यास संबंधितांना ते नोंदविता येणार आहेत. तसेच ग्रंथाचे नाव, लेखकाचे नाव, प्रकाशकाचे नाव किंवा ग्रंथाची किंमत यामध्ये काही चूक अथवा दुरुस्ती आवश्यक असल्यास त्याबाबतही लेखी स्वरूपात कळविण्याची संधी देण्यात आली आहे.
यासाठी संबंधितांनी ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई - ४००००१ या पत्त्यावर ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत आपले म्हणणे सादर करावे.
मुदतीनंतरच्या सूचनांचा विचार होणार नाही -
निवड यादीचे अवलोकन करून आवश्यक त्या सूचना, हरकती किंवा आक्षेप निर्धारित मुदतीत सादर करणे आवश्यक आहे. ३१ ऑक्टोबर २०२६ नंतर प्राप्त होणाऱ्या सूचनांचा विचार केला जाणार नाही, असे जिल्हा ग्रंथालय अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.




Petrol Price




