खेळातून मैत्री व स्नेह निर्माण करावे - डॉ. मोहितकुमार गर्ग


- रांगी येथे प्रकल्पस्तरीय क्रीडा संमेलनाचे थाटात उद्घाटन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
या क्रीडा संमेलनामुळे माझ्या शालेय बालपणाची मला आठवण झाली. खेळामध्ये हार-जीत असतेच. परंतु हरल्यामुळे निराश न होता खेळाडूवृत्तीने खेळावे. मनामध्ये कुठलीही कटुता न ठेवता मैत्री व स्नेहाचे वातावरण या क्रीडा संमेलनाच्या निमित्ताने एकमेकांत निर्माण करावे. जीवन अतिमहत्वाचे आहे. त्यामुळे कुठल्याही वाईट मार्गाकडे वळू नये. आदिवासी विभाग व पोलीस यांच्यामध्ये योग्य समन्वय असल्यामुळे चांगल्या गोष्टींचा विद्यार्थ्यांने फायदा करून घ्यावा. मेहनत घेऊन गडचिरोली जिल्हा, राज्य व देशाचे नावलौकिक करावे, असे प्रतिपादन अपर पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी केले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत धानोरा तालुक्यातील रांगी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या  क्रीडांगणावर मंगळवार, १९  नोव्हेंबर २०१९ रोजी तीन दिवसीय प्रकल्पस्तरीय क्रीडा संमेलनाचे उद्घाटन पार पडले. त्याप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. त्यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून क्रीडासंमेलनाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड होत्या. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना त्या म्हणाल्या, क्रीडा संमेलन हे व्यसनमुक्त म्हणून यशस्वी करून दाखवावे. आदिवासी खेळाडूंने खर्रा, तंबाखू, दारू आदी व्यसन करू नये. प्रत्येकांनी जीवनात व्यसनमुक्तीचा संकल्प घ्यावा. व्यसनामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. कर्करोगासारखे जीवघेणे आजार होतात. मी डॉक्टर असल्याने खात्रीने सांगते की, निर्व्यसनी राहिल्याने जीवनात खूप फायदे आहेत व खरा आनंद मिळतो. खेळातून उत्सुकता व संयम शिकायला मिळते. याचे संतुलन जो करायचे शिकतो तो जिवनात यशस्वी होतो. प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, रांगी ग्रा.पं. सरपंच जगदीश कन्नाके, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश काटेंगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनायक किरंगे, उपसरपंच नरेंद्र भुरसे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी अनिल सोमनकर, वंदना महल्ले, सुधाकर गौरकर, रांगीचे प्रभारी मुख्याध्यापक अनिल रामटेके आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रकल्पस्तरीय क्रीडा संमेलनाचे आयोजन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांच्या मार्गदर्शन व नियंत्रणाखाली केलेले आहे. कार्यक्रमस्थळी रांगी शाळेच्या मुली व मुलांनी नृत्य सादर करून उपस्थितांचे मने जिंकली. देश्वरी सलाम ह्या विद्यार्थिनीने खेळाडूंना शपथ दिली. 17 वर्ष मुलांच्या कबड्डीच्या उद्घाटनीय सामन्यात कारवाफा बीट संघाने अंगारा बीट संघावर मात केली. याप्रसंगी चांदाळा येथे नुकत्याच झालेल्या कारवाफा बीटस्तरीय क्रीडा संमेलनात उत्तम सहयोग दिल्याबद्दल चांदाळा ग्रामसभेचे अध्यक्ष सुरेश बंबोळे व त्यांच्या सहकाऱ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
गडचिरोली प्रकल्पातील कारवाफा बिटातील 9, भाडभीडी बिटात 8, सोडे बिटात 10, अंगारा बिटात 8 व कोरची बिटातील 8 अशा एकूण 43 आश्रमशाळेतील 14,17 व 19 वर्षे वयोगटातील 1 हजार 100 खेळाडूंचा सहभाग आहे. यात 25 शासकीय व 18 अनुदानित आश्रमशाळांचा समावेश आहे. या क्रीडा संमेलनात कबड्डी, खो-खो, व्हॉलीबाल, हॅन्डबाल या सांघिक खेळासह धावणे, लांबउडी, उंचउडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक आदी वैयक्तिक खेळांचे आयोजन केले आहे. क्रीडा कौशल्यासह सांस्कृतिक कलागुणांची उधळण देखील आश्रमशाळेतील आदिवासी खेळाडूंकडून होणार आहे. सदर क्रीडा संमेलन व्यसनमुक्ती संकल्पनेवर आधारित आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले. संचालन अनिल बारसागडे तर आभारप्रदर्शन धनंजय वाणी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी क्रीडा समन्वयक संदिप दोनाडकर, सुधीर शेंडे, ए. ए. रामटेके, प्रेमिला दहागावकर, पी. व्ही. भोयर, यु. वाय. बिसेन, टी. एम. सोनकुसरे, बी. आर. इरखेडे, पी. के. आत्राम, अनिल कुरुडकर, व्यंकटेश चाचरकर, मंगेश ब्राम्हणकर, सुभाष लांडे, अश्विन सारवे, विनोद चलाख, संतोष गैनवार, विनायक क्षीरसागर, अजय वाकडे, सुधीर झंझाड, आशिष नंदनवार, आनंद बहिरवार, रामचंद्र टेकाम, अमित मेश्राम, संजय नेवारे, शैलेश भैसारे यांच्यासह कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-11-19


Related Photos