गैरहजर असलेल्या वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची चौकशी करून अहवाल तत्काळ पाठवा


- जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र
- जि. प. उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या भेटीदरम्यान कर्मचारी होते अनुपस्थित
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या भेटीदरम्यान चामोर्शी तालुक्यातील पावीमुरांडा येथील प्राथमिक आरोग्य पथकात केवळ एक शिपाई उपस्थित होता. त्यामुळे कंकडालवार यांनी तीव्र संताप व्यक्त करुन अनुपस्थित कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. या बाबीची दखल घेत जिल्हा परिषेदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी चामोर्शीचे तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. साहस बेंडले यांना 13 नोव्हेंबर 2019 रोजी पत्र देत अनुपस्थित वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची चौकशी करुन अहवाल तत्काळ पाठविण्याच्या सूचना केल्या आहेत.
जिल्हा परिषेदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य समिती सभापती अजय कंकडालवार यांनी 6 नोव्हेंबर 2019 रोजी चामोर्शी तालुक्यातील पावीमुरांडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली असता त्यावेळी केवळ एक शिपाई कर्तव्यावर उपस्थित होता. इतर सर्व अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित होते. त्यामुळे जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. अनुपस्थित कर्मचाऱ्यांनी सुट्टीचा अर्जही टाकलेला नव्हता. तसेच आरोग्य केंद्रातील बायोमेट्रीक मशीन सुद्धा नव्हती. कर्मचाऱ्यांनी सप्टेंबर ते ऑक्टोबर 2019 पर्यंत घेतलेल्या एकही सुट्टीचा अर्ज केला नसल्याचे निदर्शनास आले. यामुळे अनुपस्थित कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करण्याच्या सूचना उपाध्यक्ष कंकडालवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या होत्या. या बाबीची दखल घेत जिल्हा परिषेदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी 13 नोव्हेंबरला चामोर्शीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. साहस बेंडले यांना पत्र पाठविले आहे.
जिल्हा परिषेदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य समिती सभापती यांनी पावीमुरांडा येथील प्राथमिक आरोग्य पथकास भेट दिली असता, तेथील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी कर्तव्यावर हजर नसलयाचे आढळून आलेले आहे. त्यामुळे तालुका आरोग्य अधिकारी म्हणून तालुक्याकडे आपले दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच तालुक्यातील प्रशासकीय कामे सांभाळण्यास आपण सक्षम नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत आपण वारंवार निष्काळजीपणा करीत आहात. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील कामांवर याचा परिणाम होत असल्याचे दिसून येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
प्राथमिक आरोग्य पथक पावीमुरांडा येथे प्रत्यक्ष जावून तेथील वैद्यकीय अधिकारी तथा आरोग्य कर्मचारी कर्तव्यावर का नव्हते याबाबत विस्तृत चौकशी करुन चौकशी अहवाल तत्काळ कार्यालयास सादर करण्यात यावा, अशाही सूचना जिल्हा आरोग्य अधिकारयांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यास पत्रातून केल्या आहेत. त्यामुळे कर्तव्यात कसूर करणाऱ्या व सुट्टीचा अर्ज न देता गैरहजर राहणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-11-14


Related Photos