महत्वाच्या बातम्या

 व्हीआयपीएस प्रकरणी ३ शहरांत ईडीचे छापे : ५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : सामान्य गुंतवणूकदारांकडून १२५ कोटी रुपये गोळा करून ते बनावट कंपन्यांच्या माध्यमातून लंपास करणाऱ्या व्हीआयपीएस समूहाशी संबंधित चार कंपन्यांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापेमारी करीत पाच कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. पुणे, नाशिक आणि कोल्हापूर या तीन शहरांत ईडी च्या अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केली.

पुणे व अहमदनगर येथून आर्थिक गुंतवणुकीचे व्यवहार करणाऱ्या व्हीआयपीएस या कंपनीने या परिसरातील अनेक सामान्य गुंतवणूकदारांकडून १२५ कोटी रुपये गोळा केले होते. मात्र, हे पैसे या गुंतवणूकदारांना कधीच परत मिळाले नाहीत. याउलट संबंधित कंपनीचा मालक दुबईत गेल्याचे त्यांना समजले.  मात्र, या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर मनी लाँड्रिंग झाल्याचे लक्षात आल्यानंतर ईडी नेही या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. याप्रकरणी ४ जून रोजी ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी विनोद कुटे यांच्या पुणे व अहमदनगर संबंधित ठिकाणी छापेमारी केली होती. त्यावेळी त्याच्या बँक खात्यातून १८ कोटी ५४ लाख रुपये जप्त केले होते.

प्रकरणाचा तपास करताना कुटे याने आणखी ४०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा संशय ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांना आला आहे. तुमचे पैसे क्रिप्टो करन्सीमध्ये, डिजिटल वॉलेटमध्ये गुंतवतो, तसेच परदेशातील बाजारातही पैसे गुंतवून तुम्हाला परदेशी चलनामध्ये परतावा देतो, असे आमिष त्याने अनेक गुंतवणूकदारांना दिले होते.

यापैकी काही गुंतवणूकदारांना परदेशी चलनात पैसेही मिळाले आहेत. मात्र, अशा व्यवहारांसाठी लागू असलेल्या परदेशी चलन विनिमय कायद्याचा त्याने भंग केल्याचे ईडी च्या तपासात दिसून आले आहे.

या योजनेसाठी कुटे याने मुंबई, पुणे, अहमदनगर येथील काही गुंतवणूकदारांकडून रोखीने पैसे घेऊन ते पैसे हवालाच्या माध्यमातून दुबईत मिळवले व त्यांचे व्यवहार केल्याचेही ईडी च्या तपासात दिसून आले आहे.





  Print






News - Rajy




Related Photos