महत्वाच्या बातम्या

 दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी डीपीसी, डीएमएफ व अलिमकोच्या समन्वयातून कृती आराखडा राबवा : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा


- दिव्यांगांसाठी १६ कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी; तालुका स्तरावरही अर्ज स्वीकारणार, ई-वाहनांसह शैक्षणिक साधनांसाठी आर्थिक मदत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना शिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार, आरोग्य, गतिशीलता आणि सुगम्य पायाभूत सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा नियोजन समिती (डीपीसी), जिल्हा खनिज प्रतिष्ठान (डीएमएफ) आणि भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलिमको) यांच्या समन्वयातून सर्वंकष कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले. दिव्यांग व्यक्तींपर्यंत विविध शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष नियोजन केले असून, याअंतर्गत १६ कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील दुर्गम भागातील दिव्यांग व्यक्तींना अर्ज सादर करण्यासाठी होणारा त्रास लक्षात घेता आता तालुका स्तरावरही अर्ज स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा निवड, छाननी व पडताळणी समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा नियोजन अधिकारी प्रसाद घाडगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवि गावंडे, दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सहायक आयुक्त चेतन हिवंज, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प संचालक अभिजीत राऊत, अलिमकोचे अधिकारी तसेच विविध विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ तसेच राज्य शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या ५ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत एक टक्का राखीव निधीतून राबविण्यात येणाऱ्या १६ कल्याणकारी योजनांचा बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील दिव्यांग व्यक्तींना दर्जेदार सहाय्यक उपकरणे व कृत्रिम अवयव उपलब्ध करून देण्याबाबत अलिमकोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. डीपीसीच्या राखीव निधीसोबतच डीएमएफ आणि अलिमकोच्या विविध उपक्रमांची सांगड घालून उपलब्ध निधीचा प्रभावी विनियोग करावा आणि जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

तालुका स्तरावर अर्ज स्वीकारण्याची सुविधा -
गडचिरोली जिल्ह्याचा विस्तीर्ण भौगोलिक विस्तार आणि दुर्गम भागातील दिव्यांग व्यक्तींना जिल्हा मुख्यालयापर्यंत येताना होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन अर्ज प्रक्रियेचे विकेंद्रीकरण करण्यात येणार आहे. त्यानुसार ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांना संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी कार्यालयात, तर नागरी भागातील लाभार्थ्यांना संबंधित नगरपालिका किंवा नगरपंचायत कार्यालयात अर्ज सादर करता येणार आहेत. याशिवाय जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, गडचिरोली येथेही अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना आपल्या जवळच्या कार्यालयात अर्ज सादर करणे शक्य होणार आहे.

ई-वाहने आणि गतिशीलतेसाठी तीन लाखांपर्यंत मदत -
दिव्यांग व्यक्तींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध आर्थिक सहाय्य योजनांचा समावेश करण्यात आला आहे. १८ ते ५० वयोगटातील पात्र दिव्यांग व्यक्तींना ई-व्हेईकल खरेदीसाठी कमाल तीन लाख रुपये, ई-बाईकसाठी दीड लाख रुपये, तर पात्र अस्थिव्यंग व्यक्तींना इलेक्ट्रिक व्हीलचेअर खरेदीसाठी एक लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या सुविधांमुळे दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्यासोबतच रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शैक्षणिक साधने -
दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शैक्षणिक साधने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. योजनानिहाय पात्रतेनुसार विद्यार्थ्यांना टॅब, टॉकिंग लॅपटॉप, स्क्रीन रीडर, स्मार्ट चष्मे, स्मार्ट केन आणि ब्रेल किट यांसारखी साधने खरेदी करण्यासाठी ७५ हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. तसेच दिव्यांग शाळांना कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शैक्षणिक साधने उपलब्ध करून देण्यासाठी प्रति संस्था दीड लाख रुपयांपर्यंत मदतीची तरतूद आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना २५ हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत प्रशिक्षण शुल्क सहाय्य देण्याचेही नियोजन आहे.

बालसंगोपन, आरोग्य आणि सुगम्य सुविधांनाही प्राधान्य -
दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार देण्यासाठीही महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. वैश्विक दिव्यांग ओळखपत्र अर्थात यूडीआयडीसाठी वैद्यकीय तपासणी करण्याकरिता जाणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना एक हजार रुपये प्रवास भत्ता दिला जाणार आहे. पात्र दिव्यांग मातांना बालसंगोपनासाठी वार्षिक २० हजार रुपये सहाय्य मिळणार असून, घरकुल योजनेचा लाभ घेतलेल्या दिव्यांग व्यक्तींना सुगम्य शौचालय बांधकामासाठी २५ हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे.

याशिवाय दिव्यांग व्यक्तींसाठी सहाय्यक उपकरणांचे प्रदर्शन, आरोग्य तपासणी व यूडीआयडी नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. पात्र लाभार्थ्यांना रेल्वे व बस प्रवास पासचे वितरण, शासकीय शाळा आणि महाविद्यालयांमध्ये रॅम्प व सुगम्य शौचालयांची उभारणी करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच शासकीय कार्यालये, रुग्णालये, बसस्थानके आणि रस्ते दिव्यांगांसाठी अधिक सुलभ व अनुकूल करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

२१ दिव्यांगत्व प्रवर्गांचे घरनिहाय सर्वेक्षण -
योजनांची माहिती जिल्ह्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक प्रचार-प्रसिद्धी करण्यात येणार आहे. स्थानिक गरजा लक्षात घेऊन आवश्यक सहाय्यक साधनांचे वितरण केले जाणार असून, नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी पात्र दिव्यांग व्यक्तींना १० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची तरतूदही करण्यात आली आहे. यासोबतच जिल्ह्यातील सर्व २१ दिव्यांगत्व प्रवर्गांतील व्यक्तींचे घरनिहाय अद्ययावत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणामुळे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींची अचूक माहिती संकलित करून त्यांच्या गरजेनुसार योजनांची अंमलबजावणी करणे शक्य होणार आहे.

दिव्यांग व्यक्तींना केवळ आर्थिक मदत देण्यापुरते मर्यादित न राहता त्यांना शिक्षण, रोजगार, आरोग्य, स्वावलंबन आणि समाजातील समान संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने हा कृती आराखडा हाती घेतला आहे. विविध विभागांनी परस्पर समन्वय ठेवून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि जिल्ह्यातील एकही पात्र दिव्यांग व्यक्ती लाभापासून वंचित राहू नये, यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.





  Print






Related Photos