महत्वाच्या बातम्या

 वर्धा लोकसभा मतदार संघासाठी ११ हजार ८२५ दिव्यांग


- मतदार बजावणार मतदानाचा हक्क

- दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर सुविधा उपलब्ध

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : येत्या २६ एप्रिल २०२४ रोजी वर्धा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. वर्धा लोकसभा मतदार संघातील दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी त्यांना व्हील चेअर, रॅम्प, स्वयंसेवक यासह अन्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग मतदारांना रांगेत प्रतिक्षेत न राहता मतदान करण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्यामुळे दिव्यांगांना मतदान करणे सुलभ होणार असून वर्धा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ११ हजार ८२५ दिव्यांग मतदानाचा हक्क बजावणार आहे.

वर्धा लोकसभा मतदार संघात एकूण ११ हजार ८२५ दिव्यांग मतदार आहे. त्यापैकी धामणगाव विधानसभा मतदार संघात १ हजार ७६१. मोर्शी विधानसभा मतदार संघात १ हजार ५७०. आर्वी विधानसभा मतदार संघात २ हजार ८६६. देवळी विधानसभा मतदार संघात १ हजार ६९५. हिंगणघाट विधानसभा मतदार संघात २ हजार १४५ आणि वर्धा विधानसभा मतदार संघात १ हजार ७८८ दिव्यांग मतदारांचा समावेश आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, प्रतीक्षा शेड, वैद्यकीय किट, केंद्रांवर रॅम्प आणि व्हीलचेअरची सोय, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राधान्याने प्रवेश सुविधा, स्वतंत्र रांगेची सुविधा, मानक चिन्हे आणि साइन बोर्ड असतील. तसेच मतदान केंद्रावर स्वयंसेवक सहाय्य उपलब्ध असणार आहे. अंध मतदारांकरीता ब्रेल लिपीतील मतदार स्लीप, अल्पदृष्टी मतदारांकरीता मॅग्नीफाईन ग्लास व डमी मतदान पत्र आदी साहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

वर्धा लोकसभा मतदार संघात दिव्यांग मतदारांसाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची सुध्दा नियुक्ती करण्यात आली आहे. दिव्यांगांनी मतदान करण्यासाठी सक्षम ॲप द्वारे वाहनाची मागणी केल्यास स्वतंत्र वाहनाची सोय सुध्दा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ पासून दिव्यांग व ८५ वर्षावरील मतदारांना गृहभेटीव्दारे टपाली मतदान करण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. ११ हजार ८२५ दिव्यांग मतदारांपैकी ३०० दिव्यांग मतदारांनी नमुना १२ डी भरून दिला होता. त्यापैकी २८० दिव्यांगांनी गृहभेटीव्दारे मतदानाचा हक्क बजावला आहे.





  Print






News - Wardha




Related Photos