परीक्षा केंद्रांमध्ये जॅमर्स बसवण्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाचे निर्देश


वृत्तसंस्था / नवीदिल्ली : परीक्षांच्या वेळी कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी परीक्षा केंद्रांमध्ये जॅमर्स बसवण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशातील सर्व उच्च शिक्षण संस्थांना दिले आहेत. सावधगिरी म्हणून सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी परीक्षा केंद्रांमध्ये मोबाईल फोन नेण्यास आधीच बंदी घातली आहे. परंतु कोणत्याही उपकरणाचा वापर करण्यास लागणारी रेडीओ फ्रिक्वेन्सीच चालू नये यासाठी जॅमर्सचा उपाय यूजीसीने सुचवला आहे.
केंद्रीय दळणवळण विभागानुसार वायरलेस टेलिग्राफी कायदा १९३३ मधील तरतुदीप्रमाणे जॅमर्स बाळगण्यास आणि त्याचा वापर करण्यास परवाना लागतो. संबंधित संस्थेकडूनच जॅमर्स लावून घ्यावेत आणि परीक्षेपूर्वी ते कार्यरत आहेत की नाहीत याची खातरजमा करावी असे यूजीसीने सर्व संस्थांना कळवले आहे.
खासगी संस्था किंवा खासगी व्यक्ती जॅमर्सचा वापर कायद्याने करू शकत नाहीत. पण यूजीसीच्या निर्देशानुसार राज्य सरकार परीक्षा केंद्रांमध्ये जॅमर्स वापरू शकते. परीक्षा घेणाऱया संस्था कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी कमी क्षमतेचे जॅमर्स केंद्रांमध्ये लावू शकतात अशी मुभा मात्र कायद्याने दिली आहे. त्यासाठी या संस्था ठरावीक काळासाठी परवाना घेऊ शकतात.
सरकारी धोरणाच्या मर्यादा पाळूनच जॅमर्सचा उपयोग करावा अशा सूचनाही यूजीसीने सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना दिल्या आहेत. अलीकडेच विश्वेश्वरय्या तंत्रशिक्षण विद्यापीठात एका विद्यार्थ्याकडे परीक्षेच्या अर्धा तास आधीच प्रश्नपत्रिका सापडली होती. कडक सुरक्षा व्यवस्थेनंतरही पेपर फुटल्याच्या या घटनेची यूजीसीने गंभीर दखल घेऊन जॅमर्सबाबत निर्देश दिले.  Print


News - World | Posted : 2019-10-23


Related Photos