महत्वाच्या बातम्या

 हाडांशी संबंधित शस्त्रक्रियेसाठी नागपूर रेफरचे प्रमाण थांबणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथे गुरुवारी ४० ते ४५ लाख रुपये किमतीची ॲडव्हान्स हाय फिक्वेन्सी सी-आर्म मशीन उपलब्ध झाली आहे. ही मशीन ऑपरेशन थिएटरमध्ये इंस्टॉलदेखील करण्यात आली आहे.

त्यामुळे लवकरच ती रुग्णांच्या शस्त्रक्रियेसाठी उपयोगी पडणार असून, हाडांशी संबंधित जटिल शस्त्रक्रियेसाठी नागपूर रेफरचे प्रमाण आता थांबणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथे रोज शेकडोच्या संख्येने रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. तसेच जिल्ह्यातील अपघातग्रस्तांना सर्वप्रथम उपचारासाठीदेखील इर्विन रुग्णालयातच दाखल केले जाते. त्यामुळे अपघातामध्ये हड्डी मोडलेल्या तसेच शस्त्रक्रियेची गरज असलेल्या अनेक रुग्णांना नागपूर रेफर करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. इर्विनमध्ये शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेली ॲडव्हान्स उपकरणे नसल्याची ओरड असायची. परंतु, आता रेफरचे प्रमाण थांबणार आहे. इर्विनच्या ऑपरेशन थिएटरमध्ये गुरुवारी ॲडव्हान्स हाय फिक्वेन्सी सी-आर्म मशीन उपलब्ध झाली असून, ती इंस्टाॅलदेखील करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच या मशीनच्या प्रात्यक्षिक (डेमो)साठी नागपूरहून विशेषतज्ज्ञ येणार आहेत. या प्रात्यक्षिकानंतरच ही मशीन नियमित रुग्णांच्या हाडांशी संबंधित शस्त्रक्रियेसाठी उपयोगात येणार आहे.

शस्त्रक्रियेची जागा स्क्रिनवर पाहता येणार : 
सी आर्म मशीनचा उपयोग हा हाडांशी संबंधित शस्त्रक्रियेसाठी केला जातो. या मशीनच्या माध्यमातून डॉक्टरांना शस्त्रक्रियेदरम्यान हाड किंवा शस्त्रक्रियेवरील अंतर्गत जागा स्क्रिनवर पाहता येते. त्यामुळे या मशीनद्वारे किरकोळ ते मोठमोठ्या शस्त्रक्रिया करणे शक्य आहे. शस्त्रक्रियेदरम्यान कोणता स्क्रू, रॉड कुठे टाकायचा आहे, हे या मशीनद्वारे ठरविले जाते.





  Print






News - Rajy




Related Photos