लोकसभेच्या टक्केवारीचा विक्रम पार करूया : जिल्हाधिकारी शेखर सिंह


- पत्रकार परिषदेतून केले आवाहन 

- मतदानाच्या अगोदर ४८ तासांमध्ये एक्झिट पोल व ऑपिनियन पोलवर बंदी 

- यासह सार्वजनिक प्रचारावरही बंदी 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यातील मतदारांनी लोकसभा निवडणूकीत विक्रमी मतदान केले होते. मात्र विधानसभेच्या निवडणूकीसाठी २१ ऑक्टोबर रोजी होत असलेल्या मतदानात मोठ्या संख्येने सहभागी होउन लोकसभेच्या मतदानाच्या टक्केवारीचा टप्पा पार करूया, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज पत्रकार परिषद आयोजित करून निवडणूक प्रक्रियेची माहिती दिली. 

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील ७ लाख ७५ हजार ३६९ मतदार सहभागी होणार आहेत. जिल्ह्यात तिन्ही विधानसभा क्षेत्रासाठी ९३२  मतदान केंद्रे आहेत. यापैकी ४५ टक्के मतदान केंद्र संवेदनशील असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. आरमोरी विधानसभा क्षेत्रात १३५, गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ९० तर अहेरी  विधानसभा क्षेत्रातील २२३ पोलिंग पार्ट्या मतदान केंद्रावर रवाना झाल्या आहेत. उर्वरित पोलिंग पार्ट्या उद्या रवाना होतील. 

निवडणुकीच्या आधी ४८ तास ऑपिनियन पोल, एक्झिट पोल दाखविता, छापता व सामाजिक माध्यमांवर अपलोड करता येणार नाही. आचारसंहितेचा भंग होणाऱ्या चुकीच्या बातम्या, अफवा याबाबतही बातम्या प्रसिद्ध करताना किंवा पोस्ट प्रसिद्ध करताना सर्व प्रकारच्या माध्यमांनी उचित काळजी घ्यावी. यासाठी पोलीस विभागातील सायबर सेल सतत लक्ष ठवून आहे. येत्या ४८ तासात विविध बाबी माध्यमे, उमेदवार व नागरीक यांना अवलंबणे बंधनकारक असते. 

यामध्ये प्रचार कालावधी संपल्यानंतर म्हणजेच मतदानाच्या ४८ तास अधी विधानसभा क्षेत्राच्या बाहेरील राजकिय व्यक्तींना जिल्हयात थांबता येत नाही. या कालावधीत सभामंडप, सभागृह यांची तपासणी केली जाते. तसेच लॉज, गेस्ट हाऊस, शासकीय विश्रामगृह या ठिकाणीही बाहेरील व्यक्तींची कसून चौकशी केली जाते. यावेळी संबंधित व्यवस्थापकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. विधानसभा क्षेत्रांच्या सीमेवर चेक पोस्टवर तपासणी करून बाहेरून येणा-या वाहनांवरही यावेळी लक्ष ठेवण्यात येते. एका ठिाकणी जमा होणा-या गटांवर बारीक पाळत ठेवून त्यांची ओळखीबाबत तपासणी केली जाते. यावेळी त्यांच्याकडे स्थानिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे. दारूबंदी जिल्हा असल्यामुळे व निवडणूक काळात दारूबंदी असल्याने याठिकाणी कोणत्याही प्रकारे दारू विक्री अढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे. कोणलाही मतदान कालावधी संपेपर्यंत लाऊड स्पीकर वाजविण्याचे अधिकार राहणार नाहीत. तसेच उमेदवार,राजकीय पक्ष व इतर कोणालाही येत्या 48 तासात सार्वजनिक ठिकाणी तसेच मंगल कार्यालय, सभागृह अशा ठिकाणी प्रचार करण्यास बंदी आहे. 

 

पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे 

• मतदानाची वेळ सर्व मतदारांनी लक्षात ठेवा. सकाळी 7.00 ते दुपारी 3.00

• लोकसभेच्या टक्केवारीचा विक्रम पार करूया

• आरमोरी 105 मतदान केंद्राच्या पार्टी दाखल तर गडचिरोली 90 व अहेरी 223 पार्टी दाखल

• जिल्हयात 85 लक्ष रूपये कॅश व लिकर ताब्यात

• मतदान केंद्राच्या 100 मी आत 144 कलम लागू

• सीमारेषेवरील 5 किमीपर्यंत दारूबंदी ड्राय डे

• 50 सुक्ष्म निरीक्षिक नेमण्यात आले आहेत

• 2.77 लक्ष मतदारांना मोबाईल संदेश व ऑडीओ कॉल करून मतदान करण्याचे आवाहन

• जिल्हयात ५ सखी मतदान केंद्र

• 96 ठिकाणी वेबकास्टींग तर 100 ठिकाणी व्हीडीओ रेकाँर्डीग

• 4120 कर्मचारी करणार मतदान प्रक्रियेत प्रत्यक्ष कार्य

• गरोदर महिला, दिव्यांग व वृध्दांसाठी रांगेची आवश्यकता नाही

 

वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती पूर्वप्रमाणित करुन घेणे बंधनकारक

राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान  २१ ऑक्टोबर रोजी होत असून त्या दिवशी आणि त्याच्या अगोदरच्या (दि. २० ऑक्टोबर) दिवशी वृत्तपत्रे तसेच सर्व मुद्रित माध्यमांतून प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व प्रमाणित करून घेणे बंधनकारक असल्याचे भारत निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. अफवा पसरवणाऱ्या आणि आक्षेपार्ह स्वरूपाच्या राजकीय जाहिराती मतदानाच्या दिवशी व त्या अगोदरच्या दिवशी प्रसिद्ध झाल्यास पूर्ण निवडणूक प्रक्रियेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. असे प्रकार यापूर्वी झाल्याचे आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. अशा जाहिराती प्रसिद्ध झाल्यास प्रतिपक्षाच्या उमेदवाराला स्पष्टीकरणाची संधीच मिळत नसून त्यामुळे त्याच्यावर एक प्रकारे अन्याय होऊ शकतो. या बाबींना आळा घालण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने संविधानाच्या कलम ३२४ नुसार प्राप्त झालेल्या तसेच आयोगाला असलेल्या इतर अधिकारांचा वापर करून हे आदेश काढले आहेत. त्यानुसार कोणताही राजकीय पक्ष, उमेदवार, संघटना किंवा व्यक्तीला मतदानाच्या तसेच त्याच्या अगोदरच्या दिवशी प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती नियमानुसार जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती (एमसीएमसी) करून प्रमाणित करून घेतल्याशिवाय प्रसिद्ध करता येणार नाही. 



  Print






News - Gadchiroli | Posted : 2019-10-19






Related Photos