कमी पाऊस, कडक ऊन अन् बंद गुरुपल्ली गावातील नळयोजना : CPI चे पाणी अधिकार आंदोलन २८ ऑक्टोबरला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील गुरुपल्ली गावातील जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेली नळ पाणीपुरवठा योजना मागील कित्येक महिन्यांपासून बंद असल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर्षी कमी पाऊस आणि आतापर्यंत कायम असलेल्या कडक उन्हामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक गंभीर झाली आहे.
त्यामुळे गावातील नळ पाणीपुरवठा त्वरित सुरू करावा, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI), गडचिरोली जिल्हा समितीच्या वतीने २८ ऑक्टोबर २०२६ रोजी पंचायत समिती, एटापल्लीसमोर पाणी अधिकार आंदोलन करण्यात येणार आहे.
गोटूलमध्ये ग्रामस्थांची बैठक; पाणीप्रश्न मार्गी लावण्याचा निर्धार -
गुरुपल्ली गावातील नागरिकांनी गावाच्या गोटूलमध्ये एकत्र येऊन आपली पाणीसमस्या CPI चे गडचिरोली जिल्हा समितीचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांच्यासमोर मांडली. मागील कित्येक महिन्यांपासून नळ पाणीपुरवठा योजना बंद असल्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.
सात दिवसांत पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी -
गुरुपल्ली गावासाठी जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेली नळ पाणीपुरवठा योजना अनेक महिन्यांपासून बंद असल्याने योजनेची पाणीपुरवठा टाकी व संबंधित यंत्रणेची तातडीने तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी CPI च्या वतीने पंचायत समिती, एटापल्ली येथील गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
योजना बंद राहण्याची कारणे शोधून सखोल चौकशी करावी, जबाबदार अधिकारी, कर्मचारी किंवा कंत्राटदार दोषी आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, तसेच चौकशीचा संपूर्ण लेखी अहवाल द्यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
२८ ऑक्टोबरला पंचायत समितीसमोर पाणी अधिकार आंदोलन -
प्रशासनाने निवेदन प्राप्त झाल्यापासून सात दिवसांच्या आत नळ पाणीपुरवठा योजना दुरुस्त करून गावात प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू करावा. अन्यथा २८ ऑक्टोबर २०२६ रोजी पंचायत समिती, एटापल्लीसमोर CPI च्या वतीने पाणी अधिकार आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
कॉ. सचिन मोतकुरवार यांचे वक्तव्य -
कमी पाऊस आणि कडक उन्हामुळे गुरुपल्ली गावात पाणीटंचाईची समस्या गंभीर झाली आहे. प्रशासनाने सात दिवसांत नळ पाणीपुरवठा त्वरित सुरू करावा, अन्यथा २८ ऑक्टोबरला पंचायत समिती, एटापल्लीसमोर CPI च्या वतीने पाणी अधिकार आंदोलन करण्यात येईल. ग्रामस्थांना पाणी मिळेपर्यंत CPI हा प्रश्न लावून धरेल.
कॉ. सचिन मोतकुरवार, जिल्हा सहसचिव, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI), गडचिरोली जिल्हा समिती.




Petrol Price




