महत्वाच्या बातम्या

 प्रत्येक मतदाराने मतदान केल्याशिवाय लोकशाहीला पूर्णत्त्व नाही : मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम


- नागपूर मतदारसंघातील मतदानाचे प्रमाण वाढणे आवश्यक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : सशक्त लोकशाहीमध्ये मतदानाचे पावित्र्य ठेवून प्रत्येक मतदाराने मतदान करणे अत्यावश्यक आहे. याच्याशिवाय लोकशाहीला पूर्णत्त्व नाही. नागपूर लोकसभेसाठी मागच्या वेळेस अवघे ५४ टक्के मतदान झाले होते हे विसरता कामा नये. याचाच अर्थ ४६ टक्के मतदारांनी आपल्या मतदानाच्या राष्ट्रीय कर्तव्याचे पालन केले नाही. यावेळेस हे चित्र बदलविण्यासाठी सर्व मतदार राष्ट्रीय कर्तव्याच्या भावनेतून मतदानाचे प्रमाण ७५ टक्यांपर्यंत नेतील, असा विश्वास राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी  एस. चोकलिंगम यांनी व्यक्त केला.

नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या पूर्वतयारीचा आज त्यांनी आढावा घेतला. बचतभवन येथे आयोजित केलेल्या या आढावा बैठकीस पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, जिल्हाधिकारी तथा नागपूर लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, रामटेक लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी तुषार ठोंबरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण महिरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनूप खांडे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नागपूर पाठोपाठ रामटेक मध्ये ६४ टक्के मतदान मागच्या वेळेस झाले होते. मतदानाचे प्रमाण हे वाढले पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाने मतदानाचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे अशी अपेक्षा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी व्यक्त केली. मतदानाचे प्रमाण ७५ टक्यांवर न्यायचे असेल तर मतदानाचा निर्धार हा शंभर टक्क्यांचा हवा. आदर्श गावांमध्ये शंभर टक्के मतदान होणे शक्य असून त्या दिशेने सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हाधिकारी तथा नागपूर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी मतदान जनजागृतीसाठी स्वीप अंतर्गत सुरु केलेल्या विविध उपक्रमांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.





  Print






News - Nagpur




Related Photos