महत्वाच्या बातम्या

 सेवा संकल्प अभियानांतर्गत  विद्यार्थ्यांना शासकीय योजनांची माहिती


- लाखांदूर व लाखनी येथे रोजगार, कौशल्य विकास आणि उद्योजकतेबाबत मार्गदर्शन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा यांच्या वतीने लाखांदूर व लाखनी तालुक्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये आणि तहसील कार्यालयात जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत एकूण ६१ विद्यार्थी-विद्यार्थिनींना विविध शासकीय योजना, रोजगाराच्या संधी आणि कौशल्य विकास कार्यक्रमांची माहिती देण्यात आली. राज्य शासनाच्या वतीने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. याअभियानाच्या माध्यमातून युवक-युवतींना रोजगार, कौशल्य विकास, प्रशिक्षण आणि स्वयंरोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन केले जात आहे.

सेवा संकल्प अभियानांतर्गत  तहसील कार्यालय, लाखांदूर येथे जनजागृती स्टॉल लावण्यात आले. यावेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी विजय पांडव यांनी  उपस्थित विद्यार्थी व युवकांना विविध शासकीय योजना व उपक्रमांची माहिती दिली. या ठिकाणी  विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

तसेच जिल्हा परिषद शाळा, गडेगाव (ता.लाखनी) येथे जनजागृती स्टॉलच्या माध्यमातून लिपिक-टंकलेखक अमित मलोडे यांनी विद्यार्थ्यांना विविध योजनांची माहिती दिली. यावेळी सेवायोजन वेबपोर्टलवर नोंदणी, नोकरी मिळविण्यासाठी सहाय्य, रोजगार मेळावे, अल्पमुदतीचे कौशल्य विकास प्रशिक्षण, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, सेवा-सोसायटी नोंदणी, करिअर मार्गदर्शनासाठी अभ्यासिका, उद्योजकतेसंबंधी नाविन्यपूर्ण उपक्रम आणि इनक्युबेशन सेंटर याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. 

उपलब्ध शासकीय सेवा व योजनांचा लाभ घेऊन युवकांनी कौशल्यवृद्धी, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधींचा उपयोग करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. सदर कार्यक्रमांचे आयोजन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या उपक्रमातून युवकांमध्ये रोजगाराभिमुख कौशल्ये, प्रशिक्षण आणि उद्योजकतेविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.





  Print






Related Photos