जमिनीचे फेरफार करण्यासाठी ८०० रूपयांची लाच घेणारा तलाठी एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा :
जमिनीचे फेरफार करून नावे चढविण्यासाठी १ हजार रूपयांच्या लाचेची मागणी करून ८०० रूपयांची लाच स्वीकारणारा तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. 
राहुल जगन चवरे (५२) असे लाचखोर तलाठ्याचे नाव असून गडेगाव ता. लाखणी येथील तलाठी साझ्यात कार्यरत आहे. तक्रारदार रेंगेपार कोठा येथील रहिवासी असून त्यांचे वडील मरण पावल्यामुळे वडीलांच्या नावे असलेली चिखलाबोडी येथील १ हेक्टर शेतजमीन फेरफार करण्यासाठी गडेगाव येथील तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. या अर्जावर काय कारवाई केली यासाठी २३ सप्टेंबर रोजी तक्रारदार तलाठी राहुल चवरे याला भेटला असता तलाठ्याने १ हजार रूपयांची मागणी केली. यावेळी तक्रारदाराने तलाठ्यास २०० रूपये दिले. उर्वरीत रक्कम उद्या आणून देतो असे सांगितले. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. 
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा येथील पोलिस निरीक्षक पुरूषोत्तम अहेरकर यांनी तक्रारीची गोपनिय शहनिशा करून तलाठी राहुल चवरे याच्यावर सापळा रचला. कारवाई दरम्यान ८०० रूपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याने गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी तलाठी चावरे याच्या घराची झडतीसुध्दा घेण्यात आली. 
सदर कारवाई पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर व अप्पर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार , पोलिस उपअधीक्षक महेश चाटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक पुरूषोत्तम अहेरकर, पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी, नापोशि अश्विन गोस्वामी, पराग राउत, सचिन हलमारे, कोमल बनकर, सुनिल हुकरे, कृणाल कढव, चालक नापोशि दिनेश धार्मिक यांनी केली आहे.

   Print


News - Bhandara | Posted : 2019-10-10


Related Photos