माॅलमधून चेक चोरून १० लाख रूपये किमतीचे सोने खरेदी करणाऱ्या आरोपींना अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
चंद्रपूर येथील एमडीआर माॅलमधून ५ चेक चोरून त्यावर बनावट स्वाक्षरी करून तब्बल  १० लाख ३७ हजार ६८२ रूपये किमतीचे सोने खरेदी करणाऱ्या आरोपींना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे.
मोहसीन दाउद कुरेेशी (२०) रा. गड्डीगोदाम नागपूर, गुन्ह्याचा सुत्रधार एमडीआर माॅलचा मॅनेजर साजिद शफी कुरेशी (३५) रा. नागपूर व रिषभ मनोज सोनी रा. सौंसर मध्यप्रदेश अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर एक आरोपी फरार आहे. एमडीआर माॅलचे मालक चोरडीया यांनी  रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या कॅबीनमधून ५ चेक चोरी करून त्यावर बनावट स्वाक्षरी करून अमरावती येथून सोने खरेदी केल्याची त्यांनी तक्रार केली होती.
गुन्हे शाखेने तपास सुरू केला. तसेच पोलिस अधीक्षकांनी वेळोवेळी पाठपुरावा व मार्गदर्शन केले. तपासादरम्यान सुरूवातीला आरोपी मोहसीन दाउद कुरेशी याला अटक करण्यात आली. त्याची चौकशी केली असता गुन्ह्याचा सुत्रधार साजीद शफी कुरेशी याचे नाव समोर आले. साजिद याने गुन्ह्याची कबुली दिली. साजीद याने मागील पाच ते सहा महिन्यांपासून माॅलच्या मालकांच्या हालवचालीवर लक्ष ठेवले होते. यादरम्यान त्याने आरोपी रिशभ मनोज सोनी रा. सौंसर मध्यप्रदेश व राजन साखरे रा. नागपूर यांच्याशी संगनमत करून गुन्ह्याची योजना आखली. यासाठी माॅलचे मालक चोरडीया यांच्याच नावाने सिम कार्ड खरेदी केले. तसेच साजीद याने त्याकरीता दोघांचे बनावट आधार कार्डसुध्दा तयार करून घेतले. ८  ऑगस्ट रोजीपूर्वीच आरोपी साजीद याने माॅल मधून ५ चेक चोरी करून आरोपी रिषभ, राजन व मोहसीन यांना चेकद्वारे सोने खरेदी करण्याचे सांगितले. त्यानुसार अमरावती येथील सराफा मार्केटमधून एकूण १० लाख ३७ हजार ३८२ रूपये किमतीचे सोने खरेदी करण्यात आले. यानंतर आरोपींनी आपसात वाटाघाटी केल्या.
आरोपींनी कोणताही पुरावा राहणार नाही याची काळजी घेतली. मात्र काद्याच्या कचाट्यातून ते बचावू शकले नाही. पोलिसांनी बारकाईने तपास करून गुन्ह्याचा छडा लावला. आरोपींनी खरेदी केलेल्या २५ तोळे सोन्यापैकी २२.५ तोळे सोने आणि ५० हजार रूपये रोख हस्तगत करण्यात आली आहे. सदर गुन्ह्यामध्ये ४ ऑक्टोबर रोजी ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे तर राजन साखरे हा फरार आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक डाॅ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलिस निरीक्षक ओ.जी. कोकाटे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पोलिस उपनिरीक्षक विकास मुंढे, सचिन गदादे, सहाय्यक फौजदार, पद्माकर भोयर, पोलिस हवालदार भुजाडे, पोलिस हवालदार बघमारे, पोलिस शिपाई बल्की, जांभुळे, झिलपे, कुंदन बावरी, नितीन, जावेद यांनी केला आहे.

 
  Print


News - Chandrapur | Posted : 2019-10-10


Related Photos