महत्वाच्या बातम्या

 धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना


- २७ मार्चपर्यंत अर्ज आमंत्रित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : आदिवासी विकास विभागाच्या अनुसूचित जमातीसाठी सुरु असलेल्या योजनांच्या धर्तीवर इतर मागासवर्ग सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाच्या शासन निर्णयानुसार धनगर समाजातील विद्यार्थ्यांना पंडित दिनदयाल उपाध्याय स्वंयम योजना सुरु करण्यात आली आहे. चालू शैक्षणिक वर्षामध्ये पंडित दिनदयाल उपाध्याय स्वंयम योजनेचे अर्ज २७ मार्च पर्यंत मागविण्यात आले आहे. धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे.  

महानगरपालिका, विभागीय शहरे आणि जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थामध्ये शिक्षण घेत असलेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे.  बारावीनंतरच्या मान्यता प्राप्त तंत्रशिक्षण व व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेले विद्यार्थी परंतू सामाजिक न्याय विभागाच्या, आदिवासी विकास विभागाच्या तसेच विद्यार्थ्यांने ज्या शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतला आहे अशा संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी पंडित दिनदयाल उपाध्याय स्वंयम योजना लागू करण्यात आलेली आहे.

ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचे अर्ज भरावयाचे आहेत त्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सामाजिक न्याय भवन बी विंग शासकिय औद्यागिक प्रशिक्षण संस्थेसमोर, दीक्षाभूमी रोड, श्रध्दानंदपेठ, नागपूर येथून अर्ज प्राप्त करुन १५ मार्चपर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, नागपूर येथे संपर्क साधावा.

पात्रतेचे निकष -

विद्यार्थी हा धनगर समाजातील असावा. अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न २.५० लाखरुपयांपेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक आपले राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संल्लग्न करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेल्या शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील विद्यार्थी रहिवासी नसावा.

विद्यार्थ्यांने बारावीनंतरचे उच्च शिक्षण घेतले असावे. किमान ६० टक्के गुण प्राप्त असावेत. केंद्र शासनाच्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येईल. तथापी दोन वर्षापेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, वैद्यकीय परिषद, फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, राज्य शासन किंवा तत्सम संस्थामार्फत मान्यता प्राप्त महाविद्यालय, संस्थेमध्ये मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांस प्रवेश मिळालेला असावा.

योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी संबधित विद्यार्थ्यांने बारावी नंतरच्या मान्यताप्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेव्दारे प्रवेश घेतलेला असावा.





  Print






News - Nagpur




Related Photos