महत्वाच्या बातम्या

 उद्योजकांनी स्थानिक रोजगार व हिताला प्राधान्य द्यावे : जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर


- विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार
- ७ हजार ३८४ रोजगाराच्या नवीन संधी  

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : राज्याचे धोरण उद्योगस्नेही आहे. विविध उद्योगांसाठी गुंतवणूक वाढीचे मार्ग प्रशस्त व्हावेत याचबरोबर लहान-मोठ्या प्रकल्पांच्या विस्तारासाठी तत्पर सहकार्याची भूमिका शासनाने घेतली आहे. उद्योजकांनीही आपली जबाबदारी ओळखून अधिकाधिक प्रमाणात स्थानिक रोजगार आणि हिताला प्राधान्य द्यावे, असे आवाहन  जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

वनामती येथील सभागृहात जिल्हास्तरीय उद्योग परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करण्यात आले. २३ फेब्रुवारी  रोजी पर्णो रिको ह्या कंपनीसोबत रुपये १ हजार ८०० कोटी एवढ्या गुंतवणुकीकरिता सामंजस्य करार पूर्ण करण्यात आलेला होता व आज झालेल्या नागपूर जिल्हा गुंतवणूक परिषदेतील ५ हजार ९६८ कोटी असे एकूण ४३ घटकांचे जिल्ह्यात ७हजार ७६८ कोटी रुपये गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले असून यातून जवळपास ७ हजार ३८४ लोकांना रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे.

कार्यक्रमास भारतीय राजस्व सेवेचे अधिकारी संजय थूल, बुटीबोरी मॅनुफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष नितीन लोणकर, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष विशाल अग्रवाल, लघू भारती आयोगाचे अध्यक्ष रवलीन सिंग खुराणा, सिडबीचे सहायक महाप्रबंधक संतोष राव मोरे, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी महेंद्र पटेल मंचावर उपस्थित होते.

राज्य सरकार उद्योगांच्या विकास आणि विस्ताराला पूर्ण सहकार्यच करेल. तसेच आपले धोरण आहे. कंपन्याचा विस्तार व्हावा, गूंतवणूक वाढ व्हावी. तसेच रोजगार संधी वाढाव्यात असेच प्रयत्न आहेत. पण उद्योगांनीही नोकऱ्या देण्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. जास्तीत जास्त स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये स्थान मिळावे, असे प्रयत्न करावेत. त्यांच्याशी संवाद वाढवावा. त्यांच्या हिताच्या गोष्टींनाही प्राधान्य दिले जावे. सुरवातीपासून आपल्याकडे असे उद्योगस्नेही धोरण आणि पोषक वातावरण राहिले आहे. जिल्हा प्रशासन उद्योगांच्या विकासात त्यांच्या पूर्ण पाठिशी आहे.

राज्याच्या औद्योगिक विकासात जिल्हा हा घटक महत्वपूर्ण आहे. त्यादृष्टीने जिल्हास्तरावर उद्योग धोरणास चालना देण्याचे धोरण शासनाने स्वीकारले आहे. नागपूर जिल्ह्यातही उद्योगस्नेही विविध योजना, सुलभ परवाना प्रक्रिया अवलंबण्यात येत आहे. जिल्ह्यात उद्योगपूरक वातावरण निर्मितीचा प्रयत्न असून उद्योगस्नेही धोरणास जिल्हा प्रशासनाचे सर्व सहकार्य राहणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर जिल्हास्तरीय उद्योग परिषदेदरम्यान सांगितले.

नागपूर विभागाचे उद्योग सहसंचालक गजेंद्र भारती यांनी परिषदेचे प्रास्ताविक केले तर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक शिवकुमार मुद्दमवर यांनी आभार मानले.  





  Print






News - Nagpur




Related Photos