महत्वाच्या बातम्या

 राष्ट्रीय लोक अदालतीत ३ हजार २४ प्रकरणांचा निपटारा


- ८ कोटी ५ लक्ष ५६ हजार रुपये तडजोड मूल्य

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे आदेशान्वये वर्धा  जिल्ह्यात झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ३ हजार २४ प्रकरणे आपसी तडजोडीने सोडविण्यात आली असून त्याचे तडजोड मूल्य ८ कोटी ५ लक्ष ५६ हजार २९२ इतके आहे.

न्यायालयामध्ये प्रलंबीत असलेले प्रकरणे तसेच वाद दाखल पूर्व प्रकरणांचा आपसी तडजोडीने जास्तीत जास्त प्रमाणामध्ये निपटारा करणे हा राष्ट्रीय लोक अदलतीचा मुख्य उद्देश आहे.

राष्ट्रीय लोक अदालतमध्ये दोन्ही पक्षकारांना आपली बाजु मांडण्याची संधी मिळते तसेच दोन्ही पक्षकारांच्या आपसी सहमतीने प्रकरणांमध्ये तडजोड होत असल्याने निकालाचे समाधान दोन्ही पक्षकारांना असते. यामुळे पक्षकारांचा वेळ व पैशाची बचत होऊन मनासारखा समझोता झाल्याने मानसिक समाधान लोक अदालतमुळे पक्षकारांना मिळते, असे विचार प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष एन. बी. शिंदे यांनी राष्ट्रीय लोक अदालत प्रसंगी व्यक्त केले.

राष्ट्रीय लोक अदालत मध्ये मोठ्या प्रमाणात प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्याचे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित पक्षकार तसेच अधिवक्ता यांना केले. राष्ट्रीय लोक अदालतमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा न्यायाधीश-४ जे. ए. पेडगावकर, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ श्रीमती आर. जे. राय, अधिवक्ता संघाचे अध्यक्ष के.पी. लोहवे, सहाय्यक शासकीय अभियोक्ता व्ही. आर. घुडे यांच्यासह न्यायाधीश, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विवेक देशमुख, अधिवक्ता मंडळी तसेच पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निकाली निघणाऱ्या प्रकरणांमुळे पक्षकारांना समाधान लाभते. कारण दोन्ही पक्षकारांच्या आपसी सहमतीने प्रकरणामध्ये समझोता होत असतो. त्यामुळे वादापेक्षा समझोता बरा या विचारानुसार पक्षकारांनी आपसातील वाद सामोपचाराने लोक अदालतीमध्ये मिटवावे असे, विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विवेक देशमुख यांनी राष्ट्रीय लोक अदालतीच्या आयोजनामागील भूमिका विषद करतांना सांगितले. कार्यक्रमाचे संचालन न्यायाधीश श्रीमती एल. एच. जाधव यांनी केले तर उपस्थितांचे आभार न्यायाधीश श्रीमती टी. ए. भोयर यांनी मानले.

वर्धा जिल्ह्यातील न्यायालयामध्ये संपन्न झालेल्या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणापैकी १ हजार १९७ प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. तडजोड झालेल्या प्रकरणामधील  तडजोडीची रक्कम ३ कोटी ८२ लाख ४३ हजार ७०२ रुपये इतके होते. तसेच वाद दाखल पुर्व प्रकरणापैकी १ हजार ८२७ इतकी प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. या प्रककरणामधील तडजोडीचे मुल्य ४ कोटी २३ लाख १५ हजार ५९० इतके  होते.

न्यायालयातील प्रलंबित  प्रकरणे व वाद दाखल प्रकरणे मिळून एकूण ३ हजार २४ इतकी प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निकाली निघाली असून प्रकरणातील एकूण तडजोडीचे मुल्य ८ कोटी ५ लाख ५६ हजार २९२ इतके आहे.





  Print






News - Wardha




Related Photos