आजपासून नामनिर्देशन भरण्यास प्रारंभ, जिल्ह्यात राजकीय वातावरण 'सायलेंट' मोडवर!


- ४ ऑक्टोबर पर्यंत करता येणार नामनिर्देशनपत्रे
- जिल्ह्यातील तिनही मतदारसंघातील कार्यकर्ते संभ्रमात 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
भारत निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणूकांचा कार्यक्रम २१ सप्टेंबर रोजी जाहिर केला.   राज्यात आचारसंहीता लागू झाली आहे. आता आज २७ सप्टेंबर रोजी अधिसुचना जारी होणार नामनिर्देशन पात्र भरण्यास प्रारंभ होत आहे.  ४  सप्टेंबरपर्यंत उमेदवारांना नामनिर्देशन करता येणार आहे. मात्र जिल्ह्यातील तिनही विधानसभा क्षेत्रातील प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांची अद्याप घोषणा झालेली नसल्याने मतदारांना ४  ऑक्टोबर पर्यंत अधिकृत उमेदवारांची प्रतीक्षाच करावी लागणार आहे. यामुळे राजकीय वातावरण  'सायलेंट' मोडवर असल्याचे दिसून येत आहे. 
जिल्ह्यात निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्या अनेकांनी आपले मुंबईत शड्डू ठोकले आहेत. सर्वच इच्छुक आपआपल्या परीने आपापल्या  पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी   प्रयत्न करताना दिसून येत आहेत. भाजपा - शिवसेनेच्या युतीबाबत अद्याप काहीही अधिकृतपणे जाहिर झालेले नाही. युती झाल्यास एखादा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला जाउ शकतो काय, याकडेही नागरीकांचे लक्ष लागले आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रातून अनेक माजी आमदार प्रमुख पक्षांच्या उमेदवारीसाठी झटत आहेत. भाजपाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नात  असलेल्या काही पदाधिकाऱ्यांची नावे समोर आली आहेत. गडचिरोली विधानसभा क्षेत्रातही भाजपा तसेच काॅंग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी अनेक इच्छूकांनी आपआपले प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र अद्याप एकाही पक्षाने अधिकृतरीत्या उमेदवारी जाहिर केलेली नाही. आरमोरी विधानसभा क्षेत्रात भाजपाकडून फारशी नावे चर्चेत नाहीत. मात्र काॅंग्रेसपुढे उमेदवारी देण्याचे आव्हान आहे. 
उमेदवारी जाहिर न झाल्यामुळे सर्वच पक्षांचे कार्यकर्तेसुध्दा संभ्रमात आहेत. अनेक जण उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असल्यामुळे नेमके कोणाचे नाव यादीत येईल याची वाट पाहत आहेत. सध्या सोशल मिडीयावर आपआपल्या समर्थकांची बाजू मांडण्याचे काम कार्यकर्त्यांकडून सुरू असल्याचे दिसून येत आहे. 
आज २७ सप्टेंबर पासून उमेदवारी दाखल करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ होणार असून उमेदवारीच जाहिर झाली नसल्यामुळे उद्या नामांकनाची पाटी कोरीच राहण्याची शक्यता आहे. शनिवारी पितृ मोक्ष मावश्या असल्याने कुणीही नामांकन करणार नाही .  तर ४ ऑक्टोबर रोजी उमेदवारांची नामनिर्देशन करण्यासाठी झुंबड उडण्याची शक्यता आहे. 
४ ऑक्टोबर पर्यंत उमेदवारांना नामनिर्देशन करता येणार असून ५ ऑक्टोबर  रोजी अर्जांची छाणणी होईल. ७ ऑक्टोबर  रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. १९ ऑक्टोबर पर्यंत  उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. २१ ऑक्टोबर  रोजी  मतदान व २४  ऑक्टोबर ला मतमोजणी होणार आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-27


Related Photos