महत्वाच्या बातम्या

 विशेष मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोहीम सुरू : ३७० रुग्णांची विनामुल्य शस्त्रक्रिया


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : राष्ट्रीय अंधत्व आणि दृष्टीक्षिणता नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत, १९ फेब्रुवारी ते ४ मार्चदरम्यान  राज्यात विशेष मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबवण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये राज्यात एक लाख रुग्णांवर मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे. सार्वजनिक रुग्णालये, मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्था तसेच रुग्णालयांमध्ये विनामूल्य मोतिबिंदू शस्त्रक्रिया केल्या जाणार असून त्याचा सामान्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

भंडारा जिल्ह्यामध्ये देखील ही मोहीम राबविण्यात येत आहे .यामध्ये भंडारा जिल्ह्यातील खासगी डॉक्टर देखील सहभागी आहेत.

आरोग्य विभागाकडून भंडारा जिल्ह्यासाठी ४१५ मोतिबिंदू शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

या मोहिमेमध्ये संपूर्ण भंडारा जिल्ह्यात नेत्र तपासणी शिबिराद्वारे रुग्णांना जिल्हा रुग्णालय भंडारा येथे आणून मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा लाभ मिळत आहे. १९ फेब्रुवारी २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहिमेमध्ये जिल्हा रुग्णालय भंडारा यांनी १४० रुग्णांना मोतीबिंदूचे शस्त्रक्रियेचा लाभ घेतला आहे.तसेच खाजगी रुग्णालयाकडून २१० रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.एकूण ३७० रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

भंडारा जिल्ह्याला ८९.१८% मोतीबिंदू शस्त्रक्रिया उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. मोतीबिंदूचे सर्वात मोठे कारण किंवा कारणे म्हणजे दुखापत किंवा वृद्धत्व. दोन्ही प्रकरणांमध्ये, डोळ्याच्या लेन्समध्ये मोतीबिंदू तयार करणा-या ऊतकांमध्ये बदल होतो. लेन्समधील तंतू आणि प्रथिने तुटायला लागतात. ज्यामुळे ढगाळ किंवा अंधुक दृष्टी येते.

अनुवांशिक किंवा जन्मजात विकारांमुळेही मोतीबिंदू होण्याचा धोका वाढू शकतो. याव्यतिरिक्त, डोळ्यांच्या इतर अनेक परिस्थितींमुळे देखील डोळ्यांचा मोतीबिंदू होऊ शकतो जसे की मधुमेह, मागील डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, स्टिरॉइड्स किंवा कठोर औषधांचा वापर.

आपल्या डोळ्यांत इमेज तयार होण्यापूर्वी प्रकाश तीन स्तरांतून जातो. पहिला स्तर म्हणजे कॉर्निया, दुसरा स्तर म्हणजे कॉर्नियामागे असलेली लेन्स व तिसरा स्तर म्हणजे रेटिना. त्यानंतर रेटिनावर म्हणजे डोळ्यातील पडद्यावर प्रकाशकिरणं आदळली की, मेंदूकडे संकेत जाऊन आपल्याला ‘इमेज’ दिसू लागते. वयोमानानुसार किंवा अन्य काही कारणांनी दुसरा स्तर म्हणजे लेन्सधील फायबर पांढरट होऊ लागतात आणि प्रकाशाची किरणं डोळ्यांच्या पडद्यापर्यंत पोहोचण्यास अडथळा निर्माण होतो. यामुळे रुग्णांना धुसर दिसू लागतं. पारदर्शक काचेवर अथवा चष्म्यासमोर वाफ साचली की जसं दिसतं तसं हे दृश्य असतं. अशा वेळी वाचन करताना, बघताना त्रास होतो.

तरी सर्व लोकांनी डोळ्यांची निगा राखावी काळजी घ्यावी. आणि या मोहिमेत  विनामुल्य मोतीबिंदु शस्त्रक्रीयेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपचंद सोयाम यांनी केले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos