महत्वाच्या बातम्या

 राज्‍यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करा : आमदार सुधाकर अडबाले यांची मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांकडे मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : राज्‍यातील सर्व शिक्षक व राज्‍य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व पेंशन योजनेचे संरक्षण करावे, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेद्वारा व्होट फॉर ओपीएस नागपूर ते मुंबई संकल्प पदयात्रा काढण्यात येत आहे. राज्‍यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना तात्‍काळ लागू करावी, अशी आग्रही मागणी राज्‍याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांकडे आमदार सुधाकर अडबाले यांनी केली.

आतापर्यंत सहा राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करण्यात आली आहे. नुकतेच सिक्कीम या राज्यानेसुद्धा जुनी पेन्शन योजना लागू केली. मात्र, महाराष्ट्र सरकारने अजूनही जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. शासनाने जुनी पेंशन योजना लागू करण्यासंदर्भात गठीत करण्यात आलेल्‍या समितीचा अहवाल सुद्धा शासनास सादर करण्यात आलेला आहे. तो अहवाल अर्थसंकल्‍पीय अधिवेशन २०२४ मध्ये सभागृहात सादर करून राज्‍यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, असेही निवदेनात म्‍हटले आहे.

नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्‍यान १२ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेद्वारा पेंशन जनक्रांती महामोर्चा काढण्यात आला होता. या महामोर्चात लाखोंच्या संख्येने राज्‍यातील कर्मचारी सहभागी झाले होते. हिवाळी अधिवेशनादरम्‍यान सरकार जुनी पेंशन योजना लागू करण्यासंदर्भात सकारात्‍मक असल्‍याचे सभागृहात म्‍हटले होते. मात्र, अजूनही यावर निर्णय झाला नाही. त्यामुळे कर्मचारी वर्गात प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. यामुळे नागपूर ते मुंबई काढण्यात येत असलेल्‍या संकल्प पदयात्रेत मोठ्या संख्येने शिक्षक-कर्मचारी सहभागी झालेले असून मुंबईच्या दिशेने निघालेले आहे. या यात्रेचा समारोप मुंबई येथील आझाद मैदानावर २८ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार आहे.

कर्मचाऱ्यांत वाढता असंतोष बघता सरकारने राज्‍यातील सर्व कर्मचाऱ्यांना तात्‍काळ जुनी पेन्शन योजना लागू करावी व राज्यातील १६ लाख कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा द्यावा, अशी मागणी राज्‍याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांकडे आमदार सुधाकर अडबाले यांनी केली. 





  Print






News - Wardha




Related Photos