शेतकऱ्यांना फळपिक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन


विदर्भ नव एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित आंबिया बहार फळपिक विमा योजना लागू करण्यात आली आहे. योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्ती व प्रतिकुल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ऐच्छिक आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीवर शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहे. ज्या शेतकऱ्यांनी सरकारी बँका, प्रादेशिक ग्रामिण बँका, व्यावसायिक बँका, खाजगी बँका इत्यादी संस्थांकडून अधिसूचित पिकांसाठी हंगामी कर्ज घेतले आहे, अशा शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हायचे किंवा नाही याबाबत घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या मुदतीच्या ७ दिवस अगोदर देणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्के विमा हप्ता भरावयाचा असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता यावा यासाठी जमीन भुधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी ४ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणीची मुभा देण्यात आली आहे. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू असून अधिसूचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच हंगामाकरीता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येणार आहे.
जिल्ह्यात केळी या फळपिकासाठी सेलू तालुक्यातील झडशी, सेलू व हिंगणी, वर्धा तालुक्यातील पिपरी मेघे, संत्रा पिकासाठी आर्वी तालुक्यातील आर्वी, वाढोणा, वाठोडा, रोहणा, खरांगणा व दौतपूर, आष्टी तालुक्यातील आष्टी, तळेगाव, साहूर व अंतोरा, कारंजा तालुक्यातील कारंजा, कन्नमवारग्राम, ठाणेगाव, सारवाडी व दाभा, सेलू तालुक्यातील हिंगणी महसूल मंडळ, वर्धा तालुक्यातील आंजी महसूल मंडळ, मोसंबी फळपिकासाठी आष्टी तालुक्यातील आष्टी, तळेगाव, साहूर अंतोरा, कारंजा तालुक्यातील कारंजा, कन्नमवारग्राम, ठाणेगाव, सारवाडी व दाभा, गावातील अधिसूचित फळपिकाचा विमा योजनेत समावेश करण्यात आला आहे.
केळी या फळपिकासाठी १ लाख ७० हजार रुपये विमा संरक्षित रक्कम असून यासाठी शेतकऱ्यांना ८ हजार ५०० विमा हप्ता भरावा लागणार आहे. संत्रा व मोंसबी फळपिकासाठी १ लाख रुपये विमा संरक्षित रक्कम असून शेतकऱ्यांना ५ हजार रुपये व आंबा फळपिकासाठी १ लाख ७० हजार रुपये विमा संरक्षित रक्कम असून यासाठी शेतकऱ्यांना ८ हजार ५०० रुपये विमा हप्ता भरावयाचा आहे. केळी व मोसंबी व आंबा या फळपिकासाठी ३१ ऑक्टोबर व संत्रा पिकासाठी ३० नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे.
संत्रा व मोसंबी फळपिकासाठी ३३ हजार रुपये विमा संरक्षित रक्कम असून शेतकऱ्यांना १ हजार ६५० रुपये भरावयाचे आहे. तर केळी फळपिकासाठी ५७ हजार रुपये विमा संरक्षित रक्कम असून शेतकऱ्यांना २ हजार ८५० रुपये अतिरिक्त भरावयाचे आहे.
जिल्ह्यात भारतीय कृषि विमा कंपनी या विमा कंपनी मार्फत राबविण्यात येत आहे. विमाधारक शेतकऱ्यांनी गारपीट, वेगाचा वारा या हवामान घटकामुळे पिकांचे नुकसान झाल्यास घटना घडल्यापासून ७२ तासाच्या आत विमा कंपनी, संबंधित मंडळ कृषि अधिकारी यांना नुकसानीची माहिती कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर विमा कंपनी जिल्हा महसूल, ग्रामिण व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.




Petrol Price




