पांजरा येथे जुगार अड्ड्यावर धाड : आठ जुगारी जाळ्यात


- रोख रक्कम, मोबाईल व दुचाकीसह १ लाख ५९ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : पोलीस स्टेशन करडी अंतर्गत पांजरा येथे ग्रामपंचायतीसमोरील सार्वजनिक रस्त्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर करडी पोलिसांनी धाड टाकून आठ जुगाऱ्यांना रंगेहात पकडले. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत रोख रक्कम, विविध कंपन्यांचे मोबाईल फोन आणि एक दुचाकी असा एकूण १ लाख ५९ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध जुगार चालविणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पांजरा येथील ग्रामपंचायतीसमोरील सार्वजनिक रस्त्यावर काही जण जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती करडी पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिस पथकाने संबंधित ठिकाणी अचानक धाड टाकली. यावेळी जुगार खेळताना आठ जण पोलिसांच्या हाती लागले.
आठ जणांना ताब्यात -
या कारवाईत संदिप बडगे, नितेश्वर नितीरमारे, राजेंद्र शेंडे, प्रविण मेश्राम, सुरेश गोस्वामी, कामदेव रेहपाडे, किशोर शेंडे आणि राकेश काळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम तसेच विविध कंपन्यांचे मोबाईल फोन आणि एक दुचाकी असा एकूण १ लाख ५९ हजार ३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेल्या मुद्देमालाची पोलिसांनी नोंद घेतली असून, या कारवाईमुळे सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या जुगाराला आळा घालण्याच्या पोलिसांच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे.
महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा -
या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या आठही जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी जुगार सुरू असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली असून, प्रकरणाचा पुढील तपास करडी पोलिसांकडून सुरू आहे.अवैध जुगार तसेच इतर गैरप्रकारांविरोधात पोलिसांकडून कारवाईचे सत्र सुरू असून, नागरिकांनी अशा प्रकारांची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.




Petrol Price




