महत्वाच्या बातम्या

 मोदी सरकारचे शेवटचे अधिवेशन : सर्व खासदारांचे निलंबन मागे घेणार, उद्या अंतरिम अर्थसंकल्प


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हे शेवटचे अधिवेशन आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज बुधवार, ३१ जानेवारी रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार आहेत. त्यानंतर गुरुवार, १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडून निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याचा प्रयत्न सत्ताधारी मोदी सरकारकडून केला जाणार आहे.

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळय़ासमोर ठेवून अयोध्येत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर फोडाफोडीच्या राजकारणात माहीर असलेल्या भाजपने बिहारमध्ये पुन्हा सत्तांतर घडवत नितीशकुमार यांना इंडिया आघाडीतून बाहेर काढत एनडीए त घेतले. त्यानंतर आता अखेरचा प्रयत्न म्हणून मतांच्या बेगमीसाठी आयती संधी भाजपकडे चालून आली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात मतदारांना प्रभावित करतील अशा घोषणा मोदी सरकारकडून केल्या जाण्याची शक्यता आहे.

या अधिवेशनाचा कार्यकाल दहा दिवसांचा असून त्यात सात बैठका अपेक्षित आहे. या अधिवेशनाचा एकूणच रागरंग हा निरोप समारंभाचा असल्याने निवडणुकांचे टेन्शन या अधिवेशनात प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर दिसणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन्ही सभागृहाला सदस्यांना संयुक्तरीत्या संबोधित करतील. त्यानंतर आर्थिक पाहणी अहवाल सादर होईल. दुसऱ्या दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. लोकसभा निवडणुकीनंतर नवे सरकार पूर्णकालीन अर्थसंकल्प मांडेल.

संसदेत प्रवेशासाठी सुरक्षा -

अखेरच्या अधिवेशनात सरकारने सुरक्षेसंदर्भात खबरदारीचे उपाय योजले आहेत. या सुरक्षा व्यवस्थेनुसार प्रेक्षक गॅलरीत प्रवेश करण्यापूर्वी स्मार्ट कार्ड टॅप करावे लागणार असून बायोमेट्रिक चाचणी आणि बॅरिकेड्सचाही मार्ग अवलंबिण्यात आला आहे.

खासदारांचे निलंबन मागे घेणार -

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मोदी सरकारने विरोधी पक्षाच्या जवळपास दीडशे खासदारांना निलंबित केले. या भूमिकेमुळे सरकारवर टीकेची झोड उठली होती. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे अखेरचे असल्याने विरोधकांना सहानुभूती मिळू नये असा सरकारचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी खासदारांचे निलंबन मागे घेण्यात येणार आहे. संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज यासंदर्भातील घोषणा केली.

निर्मला सीतारामन यांचा विक्रम -

१ फेब्रुवारीला अंतरिम बजेट सादर केल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदला जाणार आहे. सलग सहा अर्थसंकल्प सादर करण्याचा पराक्रम त्या करतील. मोरारजी देसाई यांचा सलग पाच अर्थसंकल्प व एक अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्याच्या विक्रमाची सीतारामन या बरोबरी करतील. मनमोहन सिंग, अरुण जेटली, यशवंत सिन्हा व पी. चिदंबरम यांचा पाचवेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम त्या यावेळी मोडीत काढतील.





  Print






News - World




Related Photos