दोन विद्यापीठांच्या असमन्वयामुळे गडचिरोली जिल्ह्यातील मॉडेल कॉलेजला आता कायमस्वरूपी टाळे!


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : 
मागास भागांमध्ये उच्च शिक्षणाचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेले गडचिरोली जिल्ह्यातील मॉडेल कॉलेज  आता कायमस्वरूपी बंद होत  आहे.  सदर कॉलेज गोंडवाना विद्यापीठाला देण्यात नागपूर विद्यापीठ कुचराई करीत आहे.   या दोन्ही विद्यापीठांच्या परस्पर असमन्वयामुळे  मॉडेल कॉलेज बंद पडले आहे.
केंद्र सरकारने राज्यातील आदिवासीबहुल गडचिरोली, नंदूरबार, धुळे, वाशीम, तारकर्ली मुंबई, जळगाव यासारख्या ठिकाणी मॉडेल कॉलेजेस सुरू केली होती. प्रत्येक कॉलेजला सुमारे दहा ते १२ कोटी रूपयांचा निधी देण्यात आला होता. परंतु, केंद्र सरकारच्या मदतीनंतरही मॉडेल कॉलेजेने अपेक्षित अशी कामगिरी केलेली नाही. 
गडचिरोली व चंद्रपूर ही दोन जिल्हे नागपूर विद्यापीठाच्या कार्यकक्षेत असताना गडचिरोलीत मॉडेल कॉलेज देण्यात आले. त्यावेळी सदर कॉलेज नागपूर विद्यापीठाशी संलग्नीत होते. परंतु गोंडवाना विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर सदर कॉलेज गोंडवाना विद्यापीठाला  हस्तांतरित करण्यात आले नाही. गोंडवाना विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान आयोगाने १२-एफची मान्यता दिली नाही. त्यामुळे सदर कॉलेज नागपूर विद्यापीठाकडेच राहिले. मात्र, नागपूर विद्यापीठाच्या प्रशासनाने त्या कॉलेजकडे दुर्लक्ष केले. तिथे पुरेशा सोयी निर्माण केल्या नाहीत. त्याशिवाय उपकेंद्राच्या इमारतीत सुरू झालेले कॉलेज हे अल्पकालीन ठरले. सध्या तिथे एकही विद्यार्थी प्रवेश घेत नाही. नियमित प्राचार्यदेखील नाहीत. नागपूर विद्यापीठाने सदर कॉलेज आता गोंडवाना विद्यापीठाला हस्तांतरित करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता. त्यासाठी राज्य सरकारकडेही प्रस्ताव पाठवला आहे. तसेच विद्यापीठ अनुदान आयोगालाही विशेष बाब म्हणून मॉडेल कॉलेज गोंडवाना विद्यापीठाला देण्याची शिफारस केली आहे. नागपूर विद्यापीठाने व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ, मिलिंद बारहाते यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. तर गोंडवाना विद्यापीठाने  देखील त्यांचे व्हीजन डॉक्युमेंट अमलात आणण्यासाठी समिती स्थापन केली. त्या दोन्ही समित्यांची गडचिरोलीत संयुक्त बैठक झाली. त्यात विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता मिळेपर्यंत राज्य सरकारचे अनुदान गोंडवानाला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु डॉ. बारहाते समितीचा अहवाल अद्याप व्यवस्थापन परिषदेसमोर सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक सत्रात देखील मॉडेल कॉलेज गोंडवाना विद्यापीठाला हस्तांतरित होईल, त्याची शक्यता वाटत नाही.
गोंडवाना विद्यापीठाला मॉडेल कॉलेजसाठी पाच एकर जागा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार विद्यापीठाच्या शेजारीच पाच एकर जागा गोंडवानाला देण्यात आली आहे. परंतु, नागपूर विद्यापीठाकडून मॉडेल कॉलेज हस्तांतरित होईस्तोवर गोंडवानाला तिथे इमारत बांधकामदेखील करता येणार नाही. त्यामुळे नागपूर विद्यापीठाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-03


Related Photos