लवारीचे नागरीक म्हणतात, जांभुळखेडा प्रकरणात गावातील सहा जण दोषी आहेत पण एक वेळ माफी द्या!


- ग्रामसभेच्या ठरावासह नागरीकांचे पोलिस अधीक्षकांना निवेदन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली
: १ मे २०१९ हा दिवस जिल्ह्यातील प्रत्येक नागरीकाला आठवणीत राहणारा दिवस ठरला. याच दिवशी देश हादरवून सोडणारी घटना कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा गावाजवळ घडली. या घटनेचा तपास करताना लवारी येथील सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. आता या गावातील नागरीकांनी ग्रामसभा घेवून ४९ नागरीकांच्या सह्यांचे निवेदन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना दिले असून 'ते सहा जण दोषी आहेत पण त्यांना एक वेळ माफी द्यावी' अशी मागणी केली आहे. आता पोलिस प्रशासन याबाबत काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.
१ मे रोजी जांभुळखेडाजवळ नक्षल्यांनी भुसुरूंग स्फोट घडवून आणला या घटनेत १५ जवान शहीद झाले. या प्रकरणात लवारी येथील परसराम माणिकराम तुलावी, दिलीप श्रीराम हिडामी, सोमसाय दलसाय मडावी, किसन सिताराम हिडाम, सकरू रामसाय गोटा आणि प्रकाश किसन हिडामी या सहा जणांना अटक करण्यात आली. सध्या हे सहाही जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. 
ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे की, गावातील तरूणांना फितवून नक्षलवाद्यांनी आपल्याबरोबर घेतले आणि १ मे रोजीची घटना घडविली. नक्षल्यांमुळे आदिवासी समाजातील लवारी येथील तरूण पिढी बर्बाद होत आहे. तसेच नक्षली हे स्वतःच्या फायद्यासाठी तरूणांचा वापर करीत आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी लवारी ग्रामसभेने पुढाकार घेउन नक्षल्यांना गावात परत पाय ठेवू देणार नाही तसेच नक्षल गावबंदीचा ठराव ग्रामसभेमार्फत घेणार असल्याचे म्हटले आहे. गावामध्ये पोलिस विभागाने जनजागरण मेळाव्याचेही आयोजन करावे, असेही पत्र पुराडा पोलिस ठाण्यात दिले आहे. 
नक्षली हे आदिवासींना जल, जंगल व जमिनीसाठी व त्यांच्या हक्कांसाठी लढत असल्याचे सांगतात. परंतु हा त्यांचा खोटारडेपणा लवारी येथील नागरीकांनी जनतेसमोर आणला आहे. नक्षल्यांना आदिवासी समाजाच्या विकासाबद्दल काहीही देणे घेणे नाही. आदिवासी समाजाच्या हितासाठी लढत असल्याचे एकीकडे भासवून दुसरीकडे आदिवासी तरूणांना वाममार्गाला लावण्याचे काम नक्षली करीत आहेत. यातून आदिवासींचा फायदा नाही तर नुकसानच होत आहे.
पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी निवेदन स्वीकारून ग्रामस्थांना पोलिस विभाग आपल्या पाठीशी आहे असा विश्वास दिला. तसेच नक्षल्यांच्या भुलथापांना बळी पडून आपले सुंदर जीवन बर्बाद करू नका व आपल्या गावाच्या विकासासाठी तसेच तरूणांच्या उज्वल भविष्यासाठी नक्षल्यांना गावात पाय ठेवू देउ नका, नक्षल गावबंदी मोहिम हाती घेवून विकासाच्या प्रवाहात सामिल व्हा, असे आवाहन केले. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-30


Related Photos