महत्वाच्या बातम्या

 केंद्रीय स्वयंपाकघरांमुळे शालेय पोषण आहारातील आवराआवरीचा प्रश्न सुटला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : महिला बचत गटांच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या केंद्रीय स्वयंपाकघरांमुळे मुंबईत पालिका आणि अनुदानित प्राथमिक शाळांमध्ये राबविल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहार योजने तील स्वच्छता, आवराआवरीच्या कामांना फाटा मिळाला असून, हे काम बऱ्यापैकी सोपे झाले आहे.

महिला बचत गट आणि इस्कॉनच्या माध्यमातून मुंबईतील १ हजार ९३९ शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजना राबविली जात आहे. मुलांना दिला जाणारा पोषण आहार शाळेबाहेरील केंद्रीय स्वयंपाकघरात बनविला जातो. मधल्या सुटीत हा गरमागरम आहार शाळेत आणून त्याचे वाटप केले जाते. हे अन्न मुलांनी आणलेल्या डब्यांमध्ये वाढले जाते. त्यामुळे शाळेत स्वच्छता आणि आवराआवरीची कामे करावीच लागत नाही. स्वयंपाकघर शाळेत नसल्याने जेवण बनवून झाल्यानंतर तिथे स्वच्छता, आवराआवर कुणी करायची, हा प्रश्नच उद्भवत नाही. शिवाय ताट-वाट्यांमध्ये अन्न वाढले जात नाही.

स्वयंपाकी- मदतनिसांमध्ये वाद : 

ग्रामीण भागात विद्यार्थ्यांकरिता पोषण आहार शिजवण्याआधी आणि नंतर करावी लागणारी स्वच्छता आणि आवराआवरीची कामे कुणी करायची यावरून शिक्षक आणि स्वयंपाकी- मदतनिसांमध्ये वाद रंगतो. त्यावर स्वयंपाकी आणि मदतनिसांनाच ही कामे करावी लागणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाने नुकतेच आदेश काढून स्पष्ट केले. मुंबईत हा वाद उद्भवतच नाही. कारण, अन्न शाळेबाहेरच शिजवून आणले जाते.

स्वयंपाकी-मदतनिसांची कामे :
पाककृतीनुसार दिलेल्या वेळेत पोषण आहार शिजवणे, तांदूळ व धान्य साफ करून घेणे, विद्यार्थ्यांना आहाराचे वाटप करणे, स्वयंपाकगृहाची स्वच्छता करणे, सांडलेले अन्न उचलणे, भांड्याची, ताट-वाट्यांची स्वच्छता करणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, विद्यार्थ्यांना पाणीवाटप करणे, शाळेतील परसबाग निर्मिती व देखभालीकरिता सहकार्य करणे, भाजीपाल्याची नोंद ठेवणे ही कामे स्वयंपाकी व मदतनिसांना ठरवून दिली गेली आहेत. मुंबईत ही कामे पहिल्यापासूनच बचत गट करतच आहेत.

मुले घरूनच आणलेल्या डब्यांमध्ये अन्न वाढून घेतात. त्यामुळे ताट-वाट्या घासण्याचाही प्रश्न येत नाही.- कीर्तिवर्धन किरतकुडवे, उपशिक्षणाधिकारी (पूर्व उपनगरे)





  Print






News - Rajy




Related Photos