अयोध्याप्रकरणी ६ ऑगस्टपासून आठवड्यातील तीन दिवस नियमित सुनावणी : सर्वोच्च न्यायालय


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
अयोध्याप्रकरणी नेमण्यात आलेल्या मध्यस्थ समितीच्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने आता या प्रकरणी ६ ऑगस्ट पासून नियमित सुनावणी घेणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच आठवड्यातील तीन दिवस या खटल्याची सुनावणी घेण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे.
अयोध्याप्रकरणी नेमण्यात आलेल्या मध्यस्थ समितीने आपला अहवाल सीलबंद लिफाफ्यात सर्वोच्च न्यायालयाकडे सादर केला होता. यावर आता सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्य घटनापीठापुढे आज सुनावणी घेण्यात आली. याप्रकरणी रोज सुनावणी घ्यायची की नाही याचा निर्णय होणार असल्याने आजच्या सुनावणीकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले होते.
सर्वोच्च न्यायालयाने माजी न्यायमूर्ती एफ. एम. खलिफुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली मध्यस्थता समिती ८ मार्चला नियुक्त केली होती. आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर आणि ज्येष्ठ विधिज्ञ श्रीराम पांचू हे समितीचे सदस्य होते. या समितीने रामजन्मभूमी आणि बाबरी मस्जिद या दोन्ही बाजूच्या लोकांशी बंद दरवाजाआड चर्चा केली आणि मध्यस्थता करण्याचा प्रयत्न केला. या चर्चेचा स्टेटस रिपोर्ट १८  जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात दिला होता. आज बंद लिफाफ्यात अंतिम अहवाल सादर केला आहे. अयोध्याप्रकरणी याचिकांवर सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच घटनापीठ स्थापन केले आहे.  Print


News - World | Posted : 2019-08-02


Related Photos