महत्वाच्या बातम्या

 बिबट्याचा धुमाकूळ : तीन शेळ्या केल्या ठार


- ताडगाव परिसरात सलग चार-पाच दिवसांपासून दहशत; वन विभागाचे पथक तळ ठोकून

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : तालुक्यातील ताडगाव परिसरात मागील चार-पाच दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून, शनिवारी २२ वर्ष रात्री बिबट्याने गावात प्रवेश करून दोन शेळ्या व एका बोकडाचा फडशा पाडल्याची घटना घडली. तसेच काही कोंबड्यांनाही बिबट्याने ठार केल्याची माहिती आहे. या घटनेमुळे ताडगाव परिसरातील शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, ताडगाव येथील कुक्सू शिवा कापगते यांच्या घराजवळील गोठ्यात शेळ्या बांधून ठेवण्यात आल्या होत्या. शनिवारी रात्री गावकरी गाढ झोपेत असताना बिबट्याने गावात प्रवेश केला. बायपास रोडलगत असलेल्या गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर त्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोन शेळ्या व एका बोकडाचा मृत्यू झाला. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत बिबट्याने त्यानंतर थेट घराच्या परिसरात धुमाकूळ घालत कोंबड्यांनाही लक्ष्य केले.

सकाळी पशुपालकांच्या हा प्रकार लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली. बिबट्याने गावातच येऊन पाळीव जनावरांची शिकार केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून, रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्यासही नागरिक धजावत नाहीत.

वन विभागाचे पथक घटनास्थळी -
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे क्षेत्र सहाय्यक दिनेश बोरकर हे पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून मृत जनावरांचा पंचनामा केला. बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी परिसराची पाहणी करण्यात येत असून, वन विभागाचे पथक गावात तळ ठोकून आहे.

बिबट्याचा वावर नेमका कोणत्या भागात आहे, त्याच्या हालचाली कोणत्या दिशेने आहेत, यावर वन विभागाचे पथक लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी घाबरून न जाता मात्र सतर्क राहावे, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

रात्री एकट्याने बाहेर पडू नका -
बिबट्याचा गावालगत वावर असल्याने वन विभागाने नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. रात्रीच्या वेळी नागरिकांनी एकट्याने घराबाहेर पडू नये. लहान मुले आणि पाळीव जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि प्रकाशमान ठेवावा, तसेच बिबट्या आढळल्यास त्याला चिथावणी देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.गावालगतच्या शेतशिवारात तसेच बायपास रोड परिसरात रात्रीच्या वेळी बिबट्याचा वावर होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनीही काळजी घेण्याची गरज आहे.

पशुपालकाला आर्थिक मदतीची मागणी -

बिबट्याच्या हल्ल्यात तीन जनावरे गमावल्याने संबंधित पशुपालकाचे मोठे नुकसान झाले आहे. वन विभागाने नुकसानग्रस्त पशुपालकाला शासनाच्या नियमानुसार तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ताडगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे.दरम्यान, गावात बिबट्याची दहशत वाढत असल्याने वन विभागाने त्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे. बिबट्याचा वावर असलेल्या भागात वन विभागाने गस्त वाढवून नागरिकांना सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.





  Print






Related Photos