महत्वाच्या बातम्या

 प्रधानमंत्री पिकविमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन


- केवळ १ रुपयात विम्याचा लाभ

- पीक विमा योजना रब्बी हंगाम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : प्रधानमंत्री पिकविमा योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त असून केवळ एक रुपया भरून शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाकरीता या योजनेत सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबर पर्यंत आपल्या नजीकच्या बॅंकेत विमा हप्ता भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. यावर्षापासून सर्वसमावेशक पिक विमा योजनेत सहभागासाठी शेतकऱ्यांना प्रतीअर्ज केवळ एक रुपया भरून सहभागी होता येणार आहे. जिल्ह्यात आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी ही विमा कंपनी आहे.

या योजनेंतर्गत जोखिमीच्या बाबींमध्ये हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमध्ये पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, हंगामातील प्रतिकुल परिस्थितीत विविध कारणाने झालेले नुकसान, पिक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे तसेच काढणी पश्चात नुकसानीचा समावेश आहे.

काढणी पश्चात नुकसान व स्थानिक आपत्ती या जोखिमेंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्वे नंबर नुसार बाधित पिक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत नुकसानीबाबतची सुचना संबंधित विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक किंवा संबंधित बॅंक, कृषि व महसुल विभागाला कळविणे आवश्यक आहे.  सर्वप्रथम पीक विमा ॲपचा वापर करण्यात यावा. तसेच नुकसान कळवितांना सर्वे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्राचा तपशील कळविणे बंधनकारक आहे.

गहू बा. पिकांसाठी ३८ हजार रुपये व हरभरा पिकासाठी ३५ हजार रुपये प्रति हेक्टर विमा संरक्षण असणार आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा संरक्षणासाठी विहित मुदतीपूर्वी नजीकची बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्ता तसेच आवश्यक कागपत्रासह विमा प्रस्ताव सादर करावा. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्याचा, न होण्याचा पर्याय उपलब्ध आहे. शेतकरी योजनेत सहभाग नोंदविण्यास इच्छुक नसेल तर तसे घोषणापत्र योजनेतील सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या ७ दिवस अगोदरपर्यंत देणे आवश्यक आहे. 

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाकरीता या योजनेमध्ये सहभागी होण्याकरीता आपल्या नजिकच्या बॅंक शाखेत तसेच आपले सरकार सेवा केंद्रामध्ये विहीत मुदतीत विमा हप्ता भरून सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos