भरधाव दुचाकीच्या धडकेत ५९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू


- रविनगर चौकातील अपघातात डोक्याला गंभीर दुखापत; उपचारादरम्यान मेडिकलमध्ये मृत्यू
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : भरधाव दुचाकीने मोपेडला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोपेडवर मागे बसलेल्या ५९ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना ८ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रविनगर चौक परिसरात घडली. विनोद श्रावण कोहाड (५९, रा. नया फुटाळा, अमरावती रोड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ८ नोव्हेंबरच्या रात्री विनोद कोहाड हे मुलाचा मित्र सूरज पारधी (२३) याच्या होंडा डिओ मोपेडवर मागे बसून रविनगर चौकातून जात होते. दरम्यान, सेनगुप्ता रुग्णालयाजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या संतोष उईके याच्या दुचाकीने त्यांच्या मोपेडला जोरदार धडक दिली.
या धडकेत मोपेडवर मागे बसलेले विनोद कोहाड रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ते अपघातानंतर तत्काळ कोमात गेले. त्यांना उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
या प्रकरणी सौरभ कोहाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी संतोष उईके (३८, रा. काचीपुरा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अंबाझरी पोलिस करीत आहेत.




Petrol Price




