महत्वाच्या बातम्या

 खिलाडूवृत्तीने महोत्सवात भाग घेऊन ध्येय व आत्मविश्वासाने कला सादर करा : जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : स्पर्धेकांनी स्पर्धा न ठेवता खिलाडूवृत्तीने युवा महोत्सवात भाग घ्यावा. ध्येय व आत्मविश्वासाने आपली कला सादर करावी, पुढे होणाऱ्या विभागीय, राज्य व राष्ट्रीय युवा महोत्सवात नावलौकिक करावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी येथे केले.

पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त कृषी विभाग व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मानकापूर विभागीय क्रीडा संकुलात आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. विभागीय क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, युवा महोत्सव समितीचे सदस्य रवींद्र हरदास, संजय दुधे, विनोद खडसे आदी उपस्थित होते.
लवकरच अत्याधुनिक सोयीनेयुक्त क्रीडा संकुल या ठिकाणी होणार असून खेळाडूंना यामुळे सरावासाठी त्याचा लाभ होणार आहे. डॉक्टर, इंजिनिअर व्हायला सर्वांना वाटते, परंतु क्रीडा क्षेत्रात सुध्दा करिअर घडू शकते. याकडे युवा वर्गाने वळावे, असा संदेश जिल्हाधिकारी यांनी दिला.

दिवसेंदिवस मानवाच्या खाणपानात बदल होत असून त्यामुळे अनेक दुर्धर रोगांचा सामना करावा लागत आहे. जगाचे लक्ष तृणधान्याकडे वळले आहे. यात रोग प्रतिकारशक्ती जास्त असते. हे वर्ष जागतिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत असून कृषी आणि क्रीडा यांच्या सहकार्याने युवा महोत्सव साजरा होत आहे.

मानवाच्या जीवनात खेळ व प्रतिकार शक्ती वाढल्यास ते दिर्घायुषी ठरू शकतात. हा उद्देश ठेवून युवा महोत्सवाचे आयोजन राज्यात करण्यात येत आहे, असे क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक तर सूत्रसंचालन क्रीडा अधिकारी माया दुबळे यांनी केले. यावेळी विस्तार कषी अधिवेत्ता विनोद खडसे यांनी सादरीकरणाद्वारे तृणधान्याविषयी महत्ती सांगितली. रवींद्र हरदास यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी विविध खेळांच्या परिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

युवा महोत्सवात पोस्टर स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा, वक्तृत्व, रांगोळी, कथा लेखन, लोकगित (एकल व दुहेरी) आदी स्पर्धा होणार आहेत. सोबतच कृषी विभागाचे विविध स्टॉल उभारण्यात आले आहे. प्रारंभी जिल्हाधिकारी यांनी दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी युवतींनी गणेश वंदनेद्वारे युवा महोत्सवास प्रारंभ केला. उपस्थितांचे आभार क्रीडा अधिकारी राजेंद्र साप्ते यांनी मानले.





  Print






News - Nagpur




Related Photos