महत्वाच्या बातम्या

 बचतगटांनी व्यवसायासाठी कर्ज योजनेचा लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले


- बचतगटाद्वारे उत्पादित वस्तूच्या विक्री व प्रदर्शनीचे उद्घाटन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : बचतगटांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत व्यवसायासाठी कर्ज प्रकरणे सादर करावी तसेच प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत कर्जप्रकरणाचे वैयक्तिक प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने महिला बचतगटांच्या उत्पादित वस्तूंचे ७ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत सितल मंगल कार्यालय येथे विक्री प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रभाकर शिवणकर, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक सुशांत पाटील, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी प्रशांत विधाते, महिला आर्थिक विकास महामंडळाचे वरीष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी नरेश उगेमुगे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना एकत्रितपणे सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत शासकीय आणि खाजगी रुग्णालयामार्फत पात्र शिधापत्रिकाधारक आणि इतर लाभार्थी गटांना विविध आजारांवर मोफत वैद्यकीय सेवा पुरविण्यात येत आहेत. यासाठी महिलांनी आपल्या कुंटूंबाचे आयुष्मान कार्ड काढून या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन राहुल कडिर्ले यांनी केले. यावेळी त्यांनी विविध व्यवसाय करणा-या महिलांसोबत संवाद साधून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचेही आवाहन केले.

माविमच्या स्थापनेपासून आजपर्यंत महिला बचतगट स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या आहे. मागील वर्षी २६३ कोटीचे कर्ज बचतगटांना बँकांमार्फत उपलब्ध करुन देण्यात आले आहे. विशेष म्हणजे परतफेडचे प्रमाण ९९.९० टक्के झाल्याचे दिसून आले, असे मुख्य कार्यकारी अधिकारी घुगे यांनी सांगितले. जिल्हा परिषद विभागांतर्गत महिलांना उद्योजकीय प्रशिक्षणासाठी विशेष आर्थिक तरतूद करण्यात येईल, असेही घुगे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात उगेमुगे यांनी केले. बचतगटाची व्यवसायाच्या माध्यमातून बरीच उलाढाल झालेली आहे. बचत गटातील महिलांना कन्वर्जनच्या माध्यमातून व्यवसायासाठी चालना देण्याचे काम करण्यात येत आहे. शेती पूरक व बिगर शेती पूरक गटांना बँक कर्जाच्या माध्यमातून सुद्धा भांडवल उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे उगेमुगे यांनी सांगितले.

प्रदर्शनीमध्ये बचतगटाच्यावतीने शोभिवंत वस्तू व दिवाळी फराळाचे स्टॉल लावण्यात आले होते. तीन दिवशीय दिवाळी महोत्सवात उद्योग करणा-या महिलांना स्थानिक बँकांमार्फत मंजूर कर्ज प्रस्तावाचे धनादेश मान्यवरांच्याहस्ते देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार भारती मोक्कदम यांनी मानले. कार्यक्रमाला माविमच्या जिल्हा कार्यालयातील कर्मचारी, महिला बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 





  Print






News - Chandrapur




Related Photos