महसूल कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी काळ्या फिती लावून आंदोलन


- जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील महसूल कर्मचारी सहभागी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
नागपूर विभागातील महसूल कर्मचाऱ्यांच्या विभागस्तरावरील न्यायीक मागण्यांसाठी वेळोवेळी निवेदने देउन चर्चा करण्यात आली. परंतु विभाग व जिल्हा स्तरावरून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने विभागीय महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध प्रकारचे आंदोलन करण्यात येत आहे. आज जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले.
कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत १७ जून रोजी महसूल उपायुक्तांची प्रत्यक्ष भेट घेवून चर्चा करण्यात आली. तसेच आंदोलनपूर्व नोटीस देण्यात आली. यावेळी तीन दिवसात कार्यवाही पूर्ण करण्यातची ग्वाही देण्यात आली. मात्र अजूनही कार्यवाही करण्यात आली नाही. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. यामुळे आज ८ जुलै पासून आंदोलन करण्यात येत आहे.
नागपूर विभागात अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गाची पदे परस्पर अदलाबदलीने भरण्यात यावी, पुरवठ्यातील अव्वल कारकून पदावर महसूलच्या कनिष्ठ लिपीकांना तदर्थ पदोन्नती देण्यात यावी, नागपूर विभागातील महसूल कर्मचाऱ्यांच्या विनंती बदलल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, नागपूर विभागातील नायब तहसीलदारांची रिक्त पदे पदोन्नतीने विधानसभा निवडणूकीपूर्वी भरण्यात यावी, सरळ सेवा कोट्यातील नायब तहसीलदारांची पदे तदर्थरित्या पदोन्नतीने भरण्यात यावी, पदोन्नत नायब तहसीलदारांना नियमित पदांचा कार्यभार देण्यात यावा, सेवानिवृत्त होणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यासोबत ते कार्यरत असलेल्या सर्व ठिकाणांहून मागविण्यात येणार्या नाहरकरत प्रमाणपत्रांची अट रद्द करण्यात यावी आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे.
आज ८ व उद्या ९ जुलै रोजी कर्मचारी काळ्या फिती लावून आंदोलन करणार आहेत. १० जुलै रोजी सर्व कर्मचारी सामुहिक रजेचा अर्ज सादर करून कार्यालयापुढे निदर्शने करतील. ११ व १२ जुलै रोजी कर्मचारी लेखनीबंद आंदोलन करतील. १५ जुलै पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करणार आहेत. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-08


Related Photos