महत्वाच्या बातम्या

 आष्टी तालुक्यात आयुष्मान भारत कार्ड काढण्याची विशेष मोहीम


-  तहसीलदारांची आपले सरकार सेवा केंद्रास भेट
- आयुष्मान भारत कार्ड काढण्याचे प्रशासनाचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबास ५ लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा देण्यात येतो. त्याअंतर्गत लाभार्थ्यांना कॅशलेस हेल्थकेअर सपोर्टसाठी आयुष्यमान भारत कार्ड वितरित करावयाचे आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या सुचनेनुसार आष्टी तालुक्यात आयुष्मान भारत कार्ड काढण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

आयुष्मान भारत कार्ड तयार करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेचा आढावा घेण्यासाठी आष्टी तालुक्यातील तळेगाव आणि काकडदरा येथील ग्रामपंचायत आणि आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी आष्टीचे तहसीलदार सचिन कुमावत आणि तालुका आरोग्य अधिकारी श्रीमती कासारे यांनी भेट देऊन पाहणी केली.

आयुष्मान भारत कार्ड काढण्यासाठी लाभार्थ्यांनी आधारकार्ड आणि त्यासोबत संलग्न असलेला मोबाईल क्रमांक यासह आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, सेतू केंद्र किंवा ग्रामपंचायत मधील सेतू केंद्र या ठिकाणी भेट द्यावयाची आहे. अल्प उत्पन्न गटासाठी असलेले हे कार्ड सर्व लाभार्थ्यांनी काढून घेणे अनिवार्य आहे. यासाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या याद्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

गावनिहाय आराखडा तयार करण्यात आलेला असून यामध्ये तालुक्यातील सर्व सेतु केंद्र, सर्व स्वस्त धान्य दुकानदार, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य विभागाचे कर्मचारी काम करीत आहे. लाभार्थ्यांनी ग्रामपंचायत मध्ये जाऊन यादी तपासून घ्यावी व त्याप्रमाणे तत्काळ नजीकच्या केंद्र, सेतू केंद्रात जाऊन आपले आयुष्मान कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन आष्टी तहसीलदार सचिन कुमावत यांनी केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos