महत्वाच्या बातम्या

 अखेर घरफोडी चोरांचे पोलिसांनी मुसक्या आवळल्या 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील राजेंद्र प्रसाद वॉर्डात भरदिवसा घरफोडी करून दागिन्यांसह १३ लाख २० हजारांचा मुद्देमाल लांबविला होता. चोर बाहेर गावचे होते त्यामुळे पोलिसांचे दमछाक उडाले होते. चोरांना कसे पकडायचे हे पोलिसांना आवाहन ठरले होते. पण बल्लारपूर पोलीस या आवाहनाला सामोरे जात आपला तपास सुरू ठेवला. त्यांना घटनेच्या ठिकाणी एक पेचकस मिळाला. त्या पेचकस मुळे बल्लारपूर पोलीस आरोपीच्या मागावर होते. अखेर सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नागपूर येथे जाऊन दोन आरोपीचे मुसक्या आवळल्या. राजेंद्र उर्फ राजहंस दुर्गाजी भेदे (वय ३०) रा. शंकरपूर बेलतरोडी नागपूर,  संतोष उर्फ मोनू गौतम निकोसे (वय ३५) रा. रामबाग नागपूर अशी आरोपींची नावे आहेत.

राजेंद्र प्रसाद वॉर्डात शिवम वाघमारे यांचे घर आहे. कामानिमित्त त्यांचे कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. दरम्यान, चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करून सोन्याच्या दागिन्यांसह १३ लाख २० हजारांचा मुद्देमाल चोरून पसार झाले. वाघमारे यांनी पोलिसात तक्रार केली. पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू करण्यात आला.

शिवम वाघमारे यांच्या घराचा पंचनामा करत असताना पोलिसांना घटनास्थळी एक पेचकस आढळला. हा पेचकस नागपूर येथून अटक केलेले आरोपी  रेल्वे चौकातील दुकानातून विकत घेतल्याचा अंदाज पोलिसांना आला. त्यावरून संबंधित दुकानासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरटे एका वाहनातून नागपूरला पसार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे आणि त्यांचे सहकारी रणवीजय ठाकूर, संतोष दांडेवार, दिलीप आदे, श्रीनिवास वाभीटकर शरद कुडे नागपुरला रवाना झाले. तेथून आरोपी राजेंद्र उर्फ राजहंस भेदे आणि संतोष उर्फ मोनू निकोसे या अट्टल गुन्हेगारांना अटक केली. या आरोपींवर वरोरा वर्धा, नागपूर, सोनेगाव हुडकेश्वर, गोंदिया, भंडारा येथे गुन्हे दाखल आहेत.

पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos