महत्वाच्या बातम्या

 श्वानपालकांना श्वानांचे लसीकरण करण्याचे आवाहन : ३० सप्टेंबरपर्यंत रेबीज सप्ताहाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : संपूर्ण जगात २८ सप्टेंबर हा दिवस जागतिक रेबीज दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून पशुसंवर्धन विभाग, नगर परिषद व नगर पंचायतीच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात २५ ते ३० सप्टेंबर या कालावधीत रेबीज लसीकरण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहा दरम्यान श्वानपालकांनी आपल्या श्वानांचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रेबीज हा विषाणुजन्य रोग असून प्रामुख्याने श्वानांमध्ये आढळून येतो. श्वान रेबीज रोगाने बाधीत झाल्यास त्यावर कुठलाही उपचार नसून फक्त लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. त्याहूनही महत्वाचे म्हणजे बाधीत श्वानाने चावा घेतल्यास हा रोग मनुष्य अथवा इतर कोणतेही जनावर रेबीज रोगाने बाधीत होऊ शकते व जिवित हानी होऊ शकते. त्यामुळे  ह्या रोगाबद्दल जनजागृती व महत्व पटवून देण्याकरीता जागतिक रेबीज दिवसाच्या निमित्ताने जिल्ह्यातील पशुवैद्यकीय संस्थाद्वारे लसीकरण व जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे.

जिल्ह्यामध्ये आतापर्यंत १ हजार २०० श्वानांचे लसीकरण झालेले असून सप्ताहादरम्यान आतापर्यंत १५० श्वानाचे लसीकरण करण्यात आले आहे. ही मोहिम ३० सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे श्वानपालकांनी आपल्या श्वानाचे जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याकडून श्वानांना रेबीजचे लसीकरण करुन घ्यावे, लसीकरण व्यवस्था दवाखान्यामध्ये निशुल्क उपलब्ध आहे. याचा लाभ श्वानपालकांनी घ्यावा, असे जिल्हा पशुसंवर्धन उपाआयुक्त डॉ. पुंडलीक बोरकर यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos