महत्वाच्या बातम्या

 पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्य महिलांकरिता पाककला प्रशिक्षण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त उपविभागीय कृषि कार्यालय आर्वीच्यावतीने तळेगाव येथे महिलांकरीता एक दिवसीय पाककला प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षणाचे उद्घाटन आर्वीच्या उपविभागीय कृषि अधिकारी सुप्रिया वायवळ यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषि विज्ञान केंद्र सेलसुराच्या तज्ञ मार्गदर्शक प्रेरणा धुमाळ, आष्टीचे तालकुा कृषि अधिकारी दिगांबर साळे, तंत्र अधिकारी शुभांगी खेरे यांची प्रमुख उपस्थिती होती. भारत सरकारने २०२३ हे वर्ष पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार शेतकरी सभा, प्रशिक्षण शाळेतील विद्यार्थ्यांच्या सभा घेऊन लोप पावत असलेल्या ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राजगिरा इत्यादी पौष्टिक तृणधान्याचे महत्व पटवून देण्यासाठी कृषि विभागाच्यावतीने तळेगाव (शामजीपंत) येथे महिलांसाठी पाककला प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सुप्रिया वायवळ यांनी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व या विषयावर तर डॉ. प्रेरणा धुमाळ यांनी पौष्टिक धान्यापासून कुठले पदार्थ बनविता येतात याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. याशिवाय प्रात्यक्षिक स्वरुपात राजगीरा पीठाचे लाडू, राजगीरा भगर व चकली, राजगीरा कुकीज, राजगीरा शेव, राजगीरा बर्फी इत्यादी पदार्थ महिलांच्या प्रत्यक्ष सहभागातून तयार करण्यात आले.

शुभांगी खेरे यांनी पौष्टिक तृणधान्यापासून बनविलेल्या पदार्थांना किंवा इतर कृषि उत्पादित मालाला योजनांशी सांगळ कशी घालता येईल याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी उपस्थित महिलांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन शुभांगी खेरे यांनी केले. तर आभार संदीप सरोदे यांनी मानले, कार्यक्रमाला आष्टी, आर्वी व कारंजा तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.





  Print






News - Wardha




Related Photos