महत्वाच्या बातम्या

 शेतकऱ्यांनो सोयाबीन पिकावरील रोगांच्या प्रादुर्भावाचे वेळीच व्यवस्थापन करा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यात ६७ हजार ७९० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची लागवड झालेली आहे. सोयाबीन एक महत्वाचे पीक असल्यामुळे त्याचे किड व रोगाचे वेळीच योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. यावर्षी तालुक्यात सोयाबीन पिकाच्या क्षेत्रामध्ये पिवळा मोझॅक, चारकोल रॉट तसेच मुळकुजचा प्रादुर्भाव दिसुन आलेला आहे.

निरीक्षण व क्षेत्रीय भेट : १९ सप्टेंबर २०२३ रोजी सोयाबीन पिकावरील विविध कीड व रोग यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरीता जिल्हास्तरीय पिक विमा संयुक्त समितीने चिमूर तालुक्यातील खानगाव, सावरी, माकोना व भिवकुंड या ठिकाणी पाहणी केली. पाहणीदरम्यान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावर, कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक डॉ. विनोद नागदेवते, चिमूरचे तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव तिखे, मंडळ कृषी अधिकारी विजय रामटेके, कृषी अधिकारी विलास शेंडे, कृषी पर्यवेक्षक रुपेश सोनवणे, बनसोड, आदींची उपस्थिती होती.

सोयाबीन पिकामध्ये सद्यस्थितीत कॉलर रॉट/चारकल रॉट या रोगाचा प्रादुर्भाव आढळुन येत आहे. या रोगामुळे प्रामुख्याने झाडे अचानक पिवळी पडतात व आकस्मीक मर झालेली दिसते. तसेच झाड सुक्ष्म होते, झाडावरील शेंगा गळू लागतात किंवा शेंगा लागत नाही. झाड अलगद उपटून येते, झाडाची मुळे बऱ्यापैकी योग्य असतात. परंतु, खोड जमिनीलगत बुरशीमुळे खराब होते. त्यामुळे मूलद्रव्य झाडाला मिळत नाही व झाड पिवळे पडून वाळते तसेच बुडाशी पांढरी बुरशी कालांतराने दिसते.

सध्याच्या कालावधीमध्ये तालुक्यात सोयाबीन पिकाचे काही शेत अचानक पिवळे पडत असल्याचे दिसून आले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे वनस्पती रोग शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार अशाप्रकारे पिके अचानक पिवळे पडणे म्हणजे रायझोक्टोनिया एरियल ब्लाइट हा रोग आहे.

करावयाच्या उपाययोजना : सध्यास्थितीमध्ये ज्या ठिकाणी प्रादुर्भाव अल्प प्रमाणात दिसुन येत आहे किंवा  प्रादुर्भाव होण्यास सुरूवात झाली आहे. अशाठिकाणी तात्काळ Tebuconazole १० टक्के + sulphur ६३ टक्के - ३ ग्र. प्रति लिटर फवारणी करावी. एकदा संपूर्ण पिवळे झालेले पीक दुरुस्त होणे शक्य नसल्याने अशा ठिकाणी फवारणी करण्यात येवू नये.  त्यामुळे सद्यस्थितीत चांगल्या असलेल्या पिकावर तात्काळ फवारणी करून घ्यावी. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos