गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या आंदोलनाला अधिकारी संघटनेचा पाठींबा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली
: सातव्या वेतनाच्या विलंबामुळे विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये शासनाप्रती तिव्र नाराजी असून महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या निर्देशानुसार १० जून पासून विविध टप्प्यांमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला अधिकारी संघटनेनेसुध्दा पाठींबा दर्शविला असल्याची माहिती गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.
पुणे येथे एसएनडीटी महिला विद्यापीठात महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाची सभा पार पडली. या सभेत कर्मचाऱ्यांच्या महत्वाच्या प्रश्नांबाबत चर्चा झााली. सातव्या वेतन आयोगाच्या सुधारित वेतन संरचना लागू करणे, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेबाबत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयान्वये रद्द करण्यात आलेले शासन निर्णय पूर्ववत लागू करणे, पदभरतीस मान्यता देणे तसेच अन्य विविध विद्यापीठांच्या प्रलंबित प्रश्नांच्या बाबतीत उच्च व तंत्र शिक्षण विभाग दुर्लक्ष करीत आहे.
कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी ३ जून ते २९ जूनपर्यंत टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याची भूमिका महासंघाने घेतली आहे. त्यानंतरही शासनाकडून सकारात्मक भूमिका न घेतल्यास महाराष्ट्रातील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
आंदोलनाचा भाग म्हणून कुलगुरू, प्र - कुलगुरू व कुलसचिव यांना ३ जून रोजी निवेदने देण्यात आली. कर्मचारी संघटनेच्या आंदोलनाला विद्यानीठ अधिकारी फोरम यांनी सहभागी होउन पाठींबा दर्शविण्याकरीता कर्मचारी संघटनेच्या वतीने अधिकारी फोरमचे अध्यक्ष दीपक जुनघरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष महादेव वासेकर, उपाध्यक्ष निलेश काळे, सचिव सतिश पडोळे, सहसचिव विजयकुमार कौशिक, कोषपाल प्रविण बुराडे, सदस्या सुचिता मोरे, प्रविण पहानपटे, सुभाष देशमुख, मनोज जाधव आदी उपस्थित होते. अधिकारी फोरमचे अध्यक्ष दीपक जुनघरे यांनी आंदोलनाला पाठींबा जाहिर केला.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-04


Related Photos