आईच्या कष्टांना लेकीच्या यशाची सलामी : घरकाम करणाऱ्या आईच्या मुलीची ऑर्डनन्स फॅक्टरीत निवड

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : घरची हलाखीची परिस्थिती, वडिलांचे व्यसन आणि आईच्या कष्टावर चालणारा संसार या प्रतिकूल परिस्थितीला नशिब मानून न बसता जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील पल्लवी चंद्रभान गुजरकर हिने आपल्या कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले आहे. दिवसभर नोकरी करून सायंकाळी अभ्यास करण्याचा दिनक्रम अंगीकारत तिने स्पर्धा परीक्षेची तयारी केली. अखेर तिच्या अथक परिश्रमाला यश मिळाले असून तिची भंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये डीबीडब्ल्यू पदावर निवड झाली आहे.
पल्लवीच्या यशाची कहाणी संघर्षातून उभ्या राहिलेल्या आत्मविश्वासाची आहे. तिचे वडील चंद्रभान गुजरकर चप्पल-जोडे दुरुस्तीचे काम करीत होते. मात्र, दारूच्या व्यसनामुळे त्यांच्याकडून कुटुंबाला अपेक्षित आधार मिळत नव्हता. अशा परिस्थितीत आई गीता यांनी घरकाम करून तीनही मुलींचा सांभाळ केला. दोन मुलींची लग्ने करून दिल्यानंतर धाकटी पल्लवी आईच्या कष्टांची जाणीव ठेवून तिच्या मदतीला उभी राहिली. पल्लवीने कोणत्याही कामाची लाज न बाळगता एका खासगी पतसंस्थेत अल्प मानधनावर काम केले आणि त्याचवेळी आपले शिक्षण सुरू ठेवले. ‘घरची परिस्थिती बदलल्याशिवाय लग्न करणार नाही,’ असा निर्धार तिने केला होता. चिंतामणी विद्यालय, विसापूर येथे दहावीपर्यंत शिक्षण घेत असताना शिक्षकांनी तिला प्रोत्साहन दिले. पुढे गावातील क्रांतीज्योती स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेतील वातावरणाचाही तिला मोठा फायदा झाला.
दिवसभर काम आणि सायंकाळी अभ्यास, असा तिचा दिनक्रम सुरू होता. आर्थिक अडचणी, कौटुंबिक परिस्थिती आणि अनेक अडथळ्यांवर मात करीत तिने स्पर्धा परीक्षेची तयारी कायम ठेवली. अखेर मेहनतीचे फळ मिळाले आणि ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये डीबीडब्ल्यू पदावर तिची निवड झाली. पल्लवीच्या या यशाची माहिती मिळताच विसापूर येथील चर्मकार समाज आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी तिच्या घरी जाऊन तिचा सत्कार केला. तिच्या संघर्षातून मिळविलेल्या यशाचे कौतुक करत समाजबांधवांनी तिच्या कर्तृत्वाला सलाम केला. ‘पल्लवीने गावाचे नाव मोठे केले,’ अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे यांनी पल्लवीच्या घरी जाऊन तिचा सत्कार केला. राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या महिला राज्य उपाध्यक्षा समिक्षा भटवलकर, विसापूर अध्यक्ष पंढरी गुजरकर, संध्या वादेकर यांच्यासह समाजबांधवांनीही तिचा गौरव केला. पल्लवीने आपल्या यशाचे श्रेय आईच्या कष्टांना, शिक्षकांच्या प्रोत्साहनाला, समाजबांधवांनी दिलेल्या मानसिक बळाला आणि संत रविदास महाराजांच्या समतावादी व क्रांतिकारी विचारांना दिले. विसापूर येथील संत रविदास संस्कार प्रबोधन केंद्रातून मिळालेले विचार आणि मार्गदर्शनाने संघर्षाच्या काळात आपल्याला नवी ऊर्जा मिळाल्याचे तिने सांगितले.




Petrol Price




