नागपूरच्या जान्हवीने दिव्यांगावर मात करत १२ वी मध्ये मिळविले घवघवीत यश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
येथील जान्हवी किन्हीकर हिच्या ८५ टक्के शरीराने तिला साथ न देण्याचे जन्मत:च ठरविले होते. मात्र, घरात सैनिकी वातावरण असल्याने तिने कधीच हार मानली नाही. दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यावर तिने बारावीतसुद्धा विपरीत परिस्थितींवर मात करीत कोणताही शिकवणी वर्ग न लावता घरीच अभ्यास करून कला शाखेत ८९ टक्के गुण मिळविले. 
दिव्यांग असूनही हिस्लॉप कॉलेजची विद्यार्थिनी जान्हवी किन्हीकर हिने बारावीच्या परीक्षेत ८९ टक्के गुण मिळवित आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. जान्हवीचे वडील मनीष किन्हीकर हे सैनदलात लेफ्टनंट कर्नल या पदावर कार्यरत आहेत. जान्हवी ही त्यांची एकुलती एक मुलगी आहे. ते म्हणाले, 'जान्हवीला स्पाईनाबिफीडा हा आजार आहे. त्यामुळे ती जन्मत: दिव्यांग असून, तिचे ८५ टक्के शरीर अपंग आहे. दिव्यांग असूनही ती लहानपणापासून फारच सकारात्मक आहे. आपण दिव्यांग असल्याने आपल्याला खूप मर्यादा आहेत याकडे तिचे फारसे लक्ष नसते. अभ्यासाव्यक्तिरिक्त ती वाचन, टीव्ही आणि चित्रपट बघणे यात रमते.' 
जान्हवी म्हणाली, 'मी बारावीसाठी कोणताही शिकवणी वर्ग न लावण्याचे ठरविले होते. मी घरीच अभ्यास केला. माझ्या पालकांनी मी दिव्यांग असल्याचे फारसे कधी जाणवू दिले नाही. वडील सैन्यदलात असल्याने त्यांच्या नेहमी बदल्या होत असे. सैन्य दलातील लोकांचे आयुष्य किती खडतर असते, हे मी बघून आहे. त्यामुळे माझीही लढण्याची मानसिकता तयार होत गेली.' जान्हवीच्या वडिलांनी तिला लहानपणीच पोहणे शिकविले. दर उन्हाळ्यात ती आवर्जून पोहण्यास जाते. याखेरीज जान्हवीला वाचनाचा छंद आहे. बेअर ग्रिल्सचे चरित्र हे आवडते पुस्तक असल्याचे ती सांगते.   Print


News - Nagpur | Posted : 2019-05-29


Related Photos