महत्वाच्या बातम्या

 राज्यात पुन्हा लोडशेडिंग सुरु : सणासुदीच्या काळात विजेचे संकट


विदर्भ न्यूज  एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : राज्यात पुन्हा लोडशेडिंग सुरू झाले आहे. अपुरा पाऊस झाल्याने विजेची मागणी वाढली आहे. ती पूर्ण करण्यास महावितरण अपयशी ठरत आहे. अशा परिस्थितीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक फिडरवर अर्धा ते एक तास भारनियमन (लोडशेडिंग) सुरू झाले आहे.

महावितरणचे म्हणणे आहे की, ऑगस्ट महिन्यात राज्यात पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे विजेची मागणी प्रचंड वाढली आहे. दुसरीकडे मान्सूनच्या पार्श्वभूमीवर महाजेनकोच्या औष्णिक वीज केंद्रातील अनेक युनिट देखभालीसाठी बंद ठेवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत मागणी आणि पुरवठा यातील अंतर दोन ते तीन हजार मेगावॅटपर्यंत वाढले आहे. महावितरणने ही समस्या सोडविण्यासाठी जी समूहाच्या फिडरवर आकस्मिकपणे लोडशेडिंग सुरू केले आहे.

महावितरणमधील सूत्रांचे म्हणणे आहे की, सध्या विजेची मागणी २६ हजार मेगावॅटपेक्षा अधिक झाली आहे. सर्वसामान्यपणे ऑगस्ट महिन्यात पावसामुळे विजेची मागणी खूप कमी झालेली असते. ही मागणी २२ ते २३ हजार मेगावॅटपर्यंत असते. परंतु यंदा पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी कृषी पंपाचा वापर करावा लागत आहे. एसी, कुलर सुरू असल्याने घरगुती विजेची मागणीसुद्धा कमी झालेली नाही. अशा परिस्थितीत मागणी व पुरवठ्याचे अंतर वाढले आहे.

लोडशेडिंग तात्पुरते : 

महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी भारत पवार यांनी सांगितले की, पुरेसा पाऊस न झाल्याने विजेचे संकट ओढवले आहे. परंतु हे लोडशेडिंग तात्पुरती आहे. शुक्रवारी बंद असलेले वीज युनिट पुन्हा सुरू होतील आणि लोडशेडिंग थांबेल.

अनेक वीज युनिट बंद : 

महाजेनकोच्या औष्णिक वीज केंद्रातील अनेक युनिट बंद आहेत. यात चंद्रपूर येथील दोन, नाशिक व पारस येथील प्रत्येकी एक युनिटचा समावेश आहे. दुसरीकडे गॅसच्या कमतरतेमुळे उरण गॅस प्रकल्पही ठप्प पडले आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे जलविद्युत प्रकल्पातूनही केवळ १४८९ मेगावॅट वीज मिळत आहे. सोलर प्रकल्पातून रात्री वीज मिळत नसल्याने रात्रीच्या वेळी लोडशेडिंगची समस्या अधिक भीषण होत आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos