महत्वाच्या बातम्या

 जनावरांमध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादूर्भाव रोखण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजना जारी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : जिल्हातील लम्पी चर्मरोगाचा प्रादूर्भाव आटोक्यात राहावा यासाठी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्हा प्रशासनाच्यावतीने जारी करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.

एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बाधीत जनावरांची वाहतूक केल्यामुळे बाधीत जनावरांपासून निरोगी जनावरांना या रोगाचा प्रादूर्भाव होण्याची दाट शक्यता असल्याने जिल्हा, राज्य सीमेवरील तपासणी नाका येथून होणाऱ्या पशुंची वाहतूक नियंत्रित करण्यात आली आहे.

प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ अन्वये जिल्ह्यातील जनावरांमध्ये लंपी चर्मरोग प्रादूर्भावाची माहिती, पशुपालक इतर कोणतीही व्यक्ती, शासनेत्तर संस्था, सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायत यांनी त्वरीत नजीकच्या पशुवैद्यकीय दावाखान्यात पशुसंवर्धन विभागास देणे बंधनकारक राहील.

जनावरांमध्ये लम्पी चर्मरोग हा संसर्गजन्य आजार असल्याने त्या संबंधित लक्षणे दिसताच लगेच त्या जनावरांचे निरोगी जनावरांपासून विलगीकरण करणे आणि नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याकडून औषधोपचार करून घेणे या बाबी पशुपालक इतर कोणतीही व्यक्ती, शासनेत्तर संस्था, सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायत यांना बंधनकारक राहणार आहे.

रोग प्रादूर्भावग्रस्त राज्य, जिल्ह्यामधून पशुधनाची ऑॅनलाईन पद्धतीने होणारी खरेदी विक्री व प्रत्यक्ष वाहतूक प्रतिबंधित करण्यात आली आहे. तसेच साथीच्या काळात बाधीत राज्य, जिल्हयातील जनावरांचा जिल्ह्यात प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला आहे.

लम्पी चर्मरोग सदृश्य लक्षणे जनावरांमध्ये आढळून आल्यास तत्काळ गाई, बैल, वासरे, म्हैस, रेडे व पारडे यांना स्वतंत्र ठेवणे, बाधीत व निरोगी जनावरे वेगवेगळी बांधणे, नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यास माहिती देणे आणि या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने पशुवैद्यकीय सल्ल्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सहाय्याने पशुपालकांनी विल्हेवाट लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

गोठ्यांमध्ये आणि आसपासच्या परिसरात स्वच्छता व निर्जंतुक द्रावणाची फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्याचे व रोगप्रसारास कारणीभूत असलेल्या डास, माशा, गोचीड इत्यादींच्या नियंत्रणासाठी औषधांची फवारणी करण्याचे ग्राम पंचायती, नगर पालिका, महानगरपालिका इत्यादींना निर्देशित केले आहे.

लम्पी चर्म रोगाचा प्रादूर्भाव व प्रसार थांबविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपालिका व महानगरपालिका यांचे मार्फत त्यांचे कार्यक्षेत्रातील भटक्या पशुधनाचे नियमित निरीक्षण करमे तसेच बाधीत पशुधनाचे विलगीकरण करून पशुवैद्यकाकडून औषधोपचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

जनावरांच्या वाहतुकीसंदर्भात, आंतरराज्यीय तपासणी नाके (केळवद व खुर्सापार ता. सावनेर) येथून गोवंशीय जनावरांना नागपूर जिल्ह्यात प्रवेशाची पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. 





  Print






News - Nagpur




Related Photos