महत्वाच्या बातम्या

 हत्तीरोग दुरीकरण मोहिमेची यशस्वीतेकडे वाटचाल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : हत्तीरोग सामुदायिक औषधोपचार मोहिम जिल्ह्यात सहा तालुक्यात राबविण्यात येत असून सद्यस्थितीत २० ऑगस्टपर्यंत २१ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले असून १२ लक्ष ३० हजार ३५२ पात्र लाभार्थ्यांपैकी २ लक्ष ५९ हजार ५९१ लाभार्थ्यांनी हत्तीरोग प्रतिबंधक गोळ्यांचे सेवन केले आहे. आरोग्य कर्मचारी प्रत्यक्ष घरोघरी जाऊन गोळ्याचे वाटप व प्रत्यक्ष लाभार्थी गाळ्याचे सेवन करीत आहेत. एकंदरीत हत्ती रोग दुरीकरण मोहिमेची वाटचाल यशस्वीतेकडे होत आहे.

नुकताच हत्तीरोग दुरीकरण मोहिम-२०२३ या कार्यक्रमाचा जिल्हास्तरीय प्रारंभ जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांच्याहस्ते करण्यात आला. याचा एक भाग म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी सुध्दा स्वत: हत्तीरोग प्रतिबंधक गोळ्याचे सेवन करुन मोहिमेस हातभार लावला आहे.

आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. कांचन वानेरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, जिल्हा शलय चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड व हिवताप विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. श्यामसुंदर निमगडे यांनी सुध्दा प्रत्यक्ष गोळ्यांचे सेवन करुन सर्वांना गोळ्या खाण्याचे महत्व पटवून दिले असून मोहिम यशस्वी करण्यासाठी आवाहन केले आहे.

मोहिमेत नागपूर जिल्हयातील हिंगणा, नागपूर, कामठी, कुही, उमरेड, भिवापूर या तालुक्यात घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत ट्रिपल ड्रग थेरेपी अंतर्गत हत्तीरोग विरोधी डीईसी, आणि आयव्हरमेक्टीन आधी गोळ्यांचे वाटप करण्यात येत आहे.

केंद्रिय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी या गोळ्याचे सेवन करण्यासाठी जनतेला आवाहन केले आहे. मोहिमेचे पर्यवेक्षण करण्याकरीता डॉ. जॉन राजण मॅथ्यू, समुदाय आणि कौटुबिक औषधी विभाग( एम्स), ऋषीकेश व राज्यस्तरावरुन प्रतिनिधी जिल्ह्यातील मोहिमेचे पर्यवेक्षणाकरीता उपस्थित झाले असून मोहिमेच्या यशस्वीतेकरीता हत्तीरोग प्रतिबंधक गोळ्यांचे सेवन करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.  

थोडक्यात हत्तीरोग - 

हत्तीरोग डास चावल्याने संक्रमित होणारा रोग आहे. शरीराचा कोणताही लोंबणारा भाग हा हत्तीरोगाने संक्रमित असू शकतो. हातापायावर सुज, पुरुषांमध्ये वृषणदाह (अंडवृध्दी), स्त्रीयामध्ये स्तनवृध्दी, जननेंद्रियावर सुज येणे ही हत्तीरोगाची लक्षणे आहे. या आजारात मृत्यु होत नसला तरी बाह्य अवयवांवर सुज येऊन विकृती येते व सामाजिक प्रतिष्ठा जाते. या आजाराची लक्षणे आल्यानंतर अपंगत्व निवारण व विकृती व्यवस्थापन केले जाते. हत्तीरोग सामुदायिक औषधोपचार मोहिमेत देण्यात येणाऱ्या औषधामुळे हत्तीरोगाचे परजीवी जंतूचा नाश होऊन हत्तीपाय व अंडवृध्दीपासून बचाव करता येते. औषध पोटातील धोकादायक इतरही जंतूचा नाश करुन खरुज व डोक्यातील उवांचाही नाश करते.





  Print






News - Nagpur




Related Photos