५० कोटी रुपये दिल्यास पंतप्रधान मोदींची हत्या करू म्हणणाऱ्या तेजबहादूर चा यु - टर्न


वृत्तसंस्था /  नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसीहून निवडणूक लढण्यासाठी अर्ज भरणारा माजी जवान तेजबहादूर यादव याच्या  व्हिडीओवरून खळबळ उडाल्यानंतर त्याने यू टर्न घेतला आहे. व्हिडीओत दिसणारी व्यक्ती मीच असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येबद्दल आपण काहीच बोललो नव्हतो असे त्याने म्हटले आहे. तसेच हा व्हिडीओ एडीट केला असून त्यात फेरफार करण्यात आल्याचा दावाही यादव याने केला आहे.
 जर कोणी ५० कोटी रुपये दिले तर २४ तासात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गोळ्या घालून ठार करेन, असे यादव या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे. यावर एकजण हिंदुस्थानमध्ये एवढे कोणी देणार नाही पाकिस्तान देईल, असे म्हणताना दिसत आहे. त्यावर देशाबरोबर मी गद्दारी करणार नाही, असेही यादव त्याला सांगताना या व्हिडीओत दिसत आहे.
 शहजाद पूनावाला यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. दरम्यान, हा व्हिडीओ २०१७ सालातील मे -जून मधला असून त्यावेळी निवडणूक लढवण्याचा आपला विचारही नव्हता, असे स्पष्टीकरण देत यादव याने या व्हिडीओचा भाजप गैरवापर करत असल्याचा आरोप केला. मात्र नंतर आपल्याच वक्तव्यावर घूमजाव करत त्याने आपण असे बोललोच नसल्याचा दावा केला आहे.  दरम्यान, हा व्हिडीओ तेजबहादूर यादव याचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर व्हायरल झाला आहे.  
 यादव याने जवानांना निकृष्ट जेवण मिळत असल्याचा दावा करत एक व्हिडीओ सोशल मीडीयावर पोस्ट केला होता. त्यानंतर सगळीकडे खळबळ उडाली होती. नंतर यादव याला नोकरीवरून काढण्यात आले. त्यानंतर यादव याने दिल्लीत धरणा आंदोलन केले होते. त्यात अनेकजण सहभागी झाले होते. पण ते आमच्या बेडरुमपर्यंत डोकावतील हे माहीत नव्हते. असेही यादव याने म्हटले असून भाजप जाणूनबूजून आणखी असेच काहीतरी शोधून काढेल. जेव्हा कोणीही त्यांचे काही ऐकत नाही त्यावेळी ते असेच काहीतरी आरोप करतात असेही यादव याने या व्हिडीओवर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे. तसेच दिल्लीत पोलीस असलेला पंकज शर्मा याने हा व्हिडीओ काढला असून ब्लॅकमेलिंग करण्यासाठीच हा व्हिडीओ बनवला आहे. तो माझ्याकडून पैसे मागत आहे. लोकं माझे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण मी जो मार्ग निवडला आहे त्यावरूनच चालतो आहे. अशा अडचणी तर येणारच. आधीही आल्या होत्या. पुढेही येतील. नोकरी करत असताना माझ्याविरूद्ध कट रचला होता, असा आरोपही यादव याने केला आहे.  Print


News - World | Posted : 2019-05-07


Related Photos