महत्वाच्या बातम्या

 प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनसहभागातून यशस्वी करूया : जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता देशभरात आयोजित मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश या अभियानाने होणार आहे. जिल्ह्यात हे अभियान ९ ते ३० ऑगस्ट या काळात जिल्हा प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी व लोकसहभागातून यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी आज केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मेरी माटी मेरा देश या अभियानाची माहिती देताना ते बोलत होते. पत्रकार परिषदेला आ. सर्वश्री प्रवीण दटके, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, जिल्हा प्रशासन अधिकारी अतुल पंत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे उपस्थित होते.

देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून व जास्तीत जास्त लोकसहभागातून हे अभियान नियोजनबद्ध आयोजित करण्यात येणार आहे. शीलाफलकाचे लोकार्पण, पंचप्राण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, वीरांना नमन, ध्वजारोहण व राष्ट्रगान असे विविध पाच उपक्रम या अभियानांतर्गत राबविण्यात येणार आहेत. शीलाफलकाचे लोकार्पण अंतर्गत गावातील दर्शनीय व महत्वाच्या ठिकाणी शिलाफलकाची उभारणी करण्यात येईल. यावर मातृभूमीसाठी बलिदान करणाऱ्या वीरांना नमन असे नमूद असेल. देशासाठी बलिदान देणाऱ्या गावातील शहीदांची नावे तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संदेश असेल.

वसुधा वंदन या कार्यक्रमांमध्ये गावात ७५ देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात येईल व यातून अमृतवनाचे निर्माण करण्यात येईल. वीरांना वंदन या कार्यक्रमांतर्गत गावामध्ये किंवा गावाच्या कार्यक्षेत्रातील स्वातंत्र्यासाठी तसेच देशाच्या सुरक्षेसाठी बलिदान दिले त्यांच्या परिवारातील सदस्यांचा सन्मान करण्यात येईल. पंच प्रण प्रतिज्ञा तसेच ध्वजारोहण व राष्ट्रगान या उपक्रमाचे आयोजनही या अभियानांतर्गत करण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावर या उपक्रमासाठी जिल्हा प्रशासन अधिकारी अतुल पंत व जिल्हा परिषदेमार्फत उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजनंदीनी भागवत यांना समन्वयाचे काम दिले आहे.

दिल्लीत अमृत वाटिका तयार करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून ७ हजार ५०० कलशांमध्ये माती घेऊन अमृत कलश यात्रा काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातूनही १४ तालुके आणि १ महानगरपालिका क्षेत्र असे एकूण १५ कलश नवी दिल्लीला पाठविले जाणार आहे. ३० ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत कर्तव्य पथ, नवी दिल्ली येथे अभियानाचा समारोप समारंभ होणार आहे. अधिक माहितीसाठी https://merimaatimeradesh.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली. यावेळी १५ ऑगस्टला यावर्षीही हर घर तिरंगा मोहीम जिल्ह्यात राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा प्रशासनाला आपल्या पॉकेटमनी मधून ७५ तिरंगे देणाऱ्या अर्णव राहूल गोल्हर या विद्यार्थ्याचे कौतुकही त्यांनी केले.

एक फोटो अपलोड करा -

जिल्ह्यातील युवकांनी सहभागाची नोंद करण्याचे आवाहन त्यांनी केले. या मोहिमेत सहभागी होताना ९ ते ३० ऑगस्टपर्यंत विविध कार्यक्रमाचे सेल्फी फोटो काढावेत व ते अपलोड करावे. यामध्ये प्रामुख्याने वृक्षारोपण, दिव्यांसोबतचा फोटो, तिरंगा घेतलेला फोटो अपलोड करता येईल. https://yuva.gov.in/meri_mati_mera_desh या लिंकवर आपले फोटो अपलोड करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पीक विम्याला शेतकऱ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद -

प्रधानमंत्री पीक विमा योजनेस गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या योजनेत कर्जदार व बिगरकर्जदार शेतकरी खातेदारांनी सहभाग नोंदविला. यंदा जिल्ह्यातील २ लाख ३३ हजार ८७५ शेतकरी खातेदारांनी पीक विमा काढल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.      





  Print






News - Nagpur




Related Photos