इको-प्रोची वारसा संवर्धन परिक्रमा उद्या वैरागड येथे येणार


- ‘आपला वारसा, आपणच जपूया’ या थिमअंतर्गत ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा जतन आणि संवर्धनासाठी परिक्रमा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली
: चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक गोंडकालिन किल्ल्याची सलग सातशे दिवस स्वच्छता केल्यानंतर चंद्रपूरात इको-प्रोच्या स्थानिक युवकांनी ‘आपला वारसा, आपणच जपूया’ असा नारा देत संपूर्ण राज्यात ऐतिहासिक वारसा आणि वन्यजीवासह निसर्गाच्या संवर्धनाचा संदेश देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ही यात्रा उद्या १ मे रोजी आरमोरी तालुक्यातील वैरागङ येथे येणार आहे. 
महाराष्ट्र वारसा जतन आणि संवर्धन संदेश परिक्रमा या नावाने हा उपक्रम उद्या १ मे रोजी महाराष्ट्र दिनापासुन सुरू होत असल्याची माहीती इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी दिली.   संपुर्ण राज्याचेच ऐतिहासिक तसेच नैसर्गिक वारसा संवर्धन व्हावे, या हेतुने सदर परिक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज हा दोन्ही प्रकारचा वारसा अनेक अडचणी - समस्यांचा सामना करित आहेत. 
आज बरेच ठिकाणी ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित असून, त्याचे जतन आणि संवर्धन गरजेचे आहे तर नैसर्गीक वारसा असलेले अभयारण्य, व्याघ्र प्रकल्पे, वन-वन्यजीव यांचा अधिवास अनेक कारणामुळे प्रभावीत होत आहेत. वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षामुळे वन्यप्राणी संवर्धनाची चळवळ संकटात आलेली आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्यासाठी सर्व पातळीवर जागृती गरजेची आहे. या दोन्ही प्रकारच्या वारसा संवर्धन जनजागृतीच्या दृष्टीने ही परिक्रमा उज्ज्वल भविष्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.
चंद्रपूर मध्ये वन-वन्यजिव तसेच ऐतिहासिक स्मारकांचा वारसा जपत असतांना स्वःप्रेरणेने लोकांनाच संवर्धनाकरिता यशस्वीपणे तयार करण्यात आले. आपला वारसा आपल्यालाच जपायचा आहे, ही भावना जशी लोकांमध्ये बिंबविण्यात यश मिळाले आणि ऐतिहासिक बदल होतो आहे तसाच बदल राज्यभरातील लोकांमधुनच स्वंयस्फुर्तीने व्हावा हा महत्वाचा संदेश या परिक्रमेतुन देण्यात येत असल्याची माहीती धोतरे यांनी दिली.
या परिक्रमेत इको-प्रो संस्थेचे २५ युवक आपल्या दुचाकीसह स्वंयप्रेरणेने भाग घेत असून सुमारे ५ हजार किमीचे राज्यभ्रमण इको-प्रो चे हे परिक्रमादुत करणार आहेत. चंद्रपूरातुन सुरू होणारी परिक्रमा वैरागड येथून नवेगाव बांध, पवनी, उमरेड मार्गे नागपूर जाईल. 
या परिक्रमेचा समारोप महाराष्ट्र भ्रमंती करुन सेवाग्राम नंतर पुन्हा चंदपूरातच होणार आहे. या परिक्रमेदरम्यान राज्यातील या विषयाशी आस्था बाळगणाऱ्या  मान्यवर व्यक्तीच्या भेटी घेऊन त्यांचेही सहकार्य भविष्यासांठी घेण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक जिल्हयात जाऊन संबधित जिल्हयातील ऐतिहासिक वारसा व वन-वन्यजीव नैसर्गीक वारसा संदर्भातिल समस्यांचा आढावा घेत त्याच्या निवारणासाठी उचित आराखडा बनविण्यासंबधांने जिल्हास्तरावर स्थानिक तसेच विशेषज्ञ यांचा बैठकाही घेण्यात येतील. या माध्यमातुन राज्यभर विणलेल्या जाळ्याचा उपयोग संपुर्ण राज्यातील या क्षेत्राच्या समस्या निवारण्यासाठी करण्यात येणार असल्याचा विश्वास धोतरे यांनी व्यक्त केला आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-30


Related Photos