तापमानात वाढ , उष्माघात व उष्माघात रुग्णांची अशी घ्या काळजी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
सध्या उन्हाळा सुरु असल्यामुळे तापमानात वाढ होवू लागली आहे. तसेच वेधशाळेकडून प्राप्त माहितीच्या आधारे येत्या काही दिवसात असणाऱ्या संभाव्य उष्णतेच्या लाटेपासून सर्वांनी स्वत:चे संरक्षण करावे , असे  आवाहन शल्य चिकित्सक,  डॉ. अनिल रुडे ,  अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. माधुरी किलनाके, यांनी केलेले आहे.
एप्रिल महिन्याच्या मध्यापासून उष्माघाताचे धोके सुरु होतात, तर एप्रिल, मे व जून हे तिन्ही महिने उन्हाळयाचे असून याच काळात उष्माघात होतो.     

उष्माघात होण्याची कारणे :   

बाहय उष्माघात व परंपरागत उष्माघात असे उष्माघाताचे दोन प्रकार असून उन्हाळयामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे, कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यातील कामे करणे, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे,  भर उन्हात दुचाकीने प्रवास करणे,  घट्ट कपडयांचा वापर करणे,  अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येण्याने उष्माघात होतो, तर परंपरागत उष्माघाताला वयोवृध्द, लठ्ठपणा, मधुमेह इत्यादी आजार असलेले रुग्ण बळी पडतात.

 लक्षणे :- 

थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैन व अस्वस्थता , बेशुद्वावस्था इत्यादी.

 प्रतिबंधक उपाय :- 

वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे, कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असतांना करावी, उष्णता शोषून घेणारे कपडे , ( काळया किंवा भडक रंगाचे कपडे ) वापरु नयेत. सैल, पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत. जलसंजीवनीचा वापर करावा. पाणी भरपूर प्यावे, सरबत प्यावे, उन्हामध्ये काम करतांना मधून मधून थोडीशी विश्रांती घ्यावी, उष्माघाताची लक्षणे दिसू लागल्यास ताबडतोब काम थांबवावे, खाली नमुद केल्याप्रमाणे उपचार घ्यावेत, उन्हात बाहेर जातांना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, उपरणे यांचा वापर करावा.
 

उपचार :- 

रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कुलर ठेवावे, वातानुकूलीत खोलीत ठेवावे, रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, रुग्णास थंड पाण्याने अंघोळ घालावी, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्टया ठेवाव्यात, आईसपॅक लावावेत, आवश्यकतेनुसार शिरेवाटे सलाईन लावावेत, जनतेला उष्माघाताची कारणे, लक्षणे व प्राथमिक उपाययोजना त्याचप्रमाणे उष्माघात होवू नये म्हणून घ्यावयाची काळजी याबाबत आपल्या नजीकच्या आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा शल्य चिकीत्सक  डॉ. अनिल रुडे , अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली  डॉ. माधुरी किलनाके, यांनी केले.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-04-16


Related Photos