आनंदनगरात अवैध मोहा दारू व्यवसायावर चंद्रपूर शहर पोलिसांचा प्रहार : छापेमारीत ७०१ लिटर दारू व सडवा जप्त; पाच जणांवर गुन्हे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील महाकाली कॉलरी परिसरातील आनंदनगर भागात सुरू असलेल्या अवैध मोहा दारू निर्मिती व साठ्याविरोधात चंद्रपूर शहर पोलिसांनी रविवारी, आज सकाळी धडक कारवाई करत मोठा साठा उद्ध्वस्त केला. या कारवाईत मोहा गावठी दारू, मोहा फुलांचा सडवा आणि दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले असून पाच जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दारूबंदी कायद्यांतर्गत विशेष मोहीम राबविण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे पथक आणि डी.बी. पथकाने आनंदनगर परिसरात शोधमोहीम हाती घेतली. तपासादरम्यान एका ठिकाणी सुरू असलेली मोहा दारूची भट्टी आढळून आली, तर चार वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोहा फुलांचा सडवा आणि हातभट्टीची दारू साठवून ठेवण्यात आल्याचे उघड झाले.
पोलिसांनी कारवाईदरम्यान २५१ लिटर मोहा गावठी दारू आणि ४५० लिटर मोहा फुलांचा सडवा जप्त केला. यासह दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्यही ताब्यात घेण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ४० हजार ७० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अवैध दारू निर्मितीमुळे कायदा व सुव्यवस्थेसह नागरिकांच्या आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण होत असल्याने पोलिसांनी या कारवाईला विशेष महत्त्व दिले आहे. संबंधित पाच संशयितांविरुद्ध दारूबंदी कायद्यानुसार स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
सदर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलटे, मपोहवा. भावना रामटेके, संजय धोटे, कपुरचंद खरवार, दिपक गुरनुले, उमेश कोडापे, निलेश ढोक, सतीश गिरी, दिपीका झिंगरे यांनी केले.
News - Chandrapur




Petrol Price




