महत्वाच्या बातम्या

 गणेश विसर्जनात नियमबाह्य डीजेचा दणदणाट : मुल पोलिसांचा दणका, २६.१० लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर ध्वनीक्षेपणाच्या नियमांचे उल्लंघन करून परवानगीविना मोठ्या आवाजात डीजे वाजविणाऱ्या दोन मंडळांवर मुल पोलिसांनी कारवाई केली. आलेवाही नवेगाव परिसरात केलेल्या या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये डीजे साऊंड सिस्टिम, स्पीकर, मिक्सर, ऑडिओ मशीन, जनरेटर, पॉवर सेवर तसेच दोन वाहने असा एकूण अंदाजे २६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

२२ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन बंदोबस्ताच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश कनाके व पोलीस पथक आलेवाही-नवेगाव परिसरात पेट्रोलिंग तसेच ध्वनीक्षेपणाच्या मर्यादेची तपासणी करीत होते. यावेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी परवानगीविना मोठ्या आवाजात डीजे वाजविला जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी पाहणी करून ध्वनीमापक यंत्राद्वारे आवाजाची तीव्रता तपासली. यामध्ये अनुक्रमे ७७.०३ डेसिबल आणि ७३.५० डेसिबल ध्वनीतीव्रता नोंदविण्यात आली.

आलेवाही येथील जय वाल्मीकी गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी एमएच-३६ एए-४१९१ क्रमांकाच्या टाटा एलपीटी वाहनावर डीजे साऊंड सिस्टिम लावून ध्वनीक्षेपण सुरू असल्याचे आढळले. तपासणीदरम्यान ७७.०३ डेसिबल आवाजाची नोंद झाली. चौकशीत डीजे मालक व ऑपरेटर रोहित युवराज येलमुले २५ वर्ष रा. सिंदपुरी, ता. पवनी, जि. भंडारा हा मंडळाच्या आयोजकांच्या सांगण्यावरून डीजे वाजवत असल्याचे समोर आले. डीजे वाजविण्यासाठी आवश्यक वैध परवानगी घेण्यात आली नसल्याचेही निष्पन्न झाले.

या कारवाईत मिक्सर, ऑडिओ मशीन, डायनामाईट मशीन, स्पीकर बँक्स, टॉप स्पीकर, टाटा एलपीटी वाहन व त्यावरील जनरेटर असा अंदाजे १५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात रोहित युवराज येलमुले, वाहन चालक भास्कर प्रल्हाद ढोरे २५ वर्ष आणि आयोजक सुरज राजू मारबते २८ वर्ष यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसरी कारवाई नवेगाव, आलेवाही येथे उज्वल ज्योत गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी करण्यात आली. एमएच-०१ बीआर-२४६१ क्रमांकाच्या टाटा ७०९ पिकअप वाहनावर डीजे साऊंड सिस्टिम बसवून मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपण सुरू असल्याचे पोलिसांना आढळले. ध्वनीमापक यंत्राद्वारे तपासणी केली असता ७३.५० डेसिबल ध्वनीतीव्रता नोंदविण्यात आली. चौकशीत डीजे मालक व ऑपरेटर गंगाधर सुखदेव बोरकर ४२ वर्ष  रा. टेकारी, ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर हा आयोजकांच्या सांगण्यावरून डीजे वाजवत असल्याचे समोर आले. या प्रकरणात गंगाधर बोरकर, वाहन चालक रोशन गजानन टिकरे २१ वर्ष आणि आयोजक वैभव धर्मराव तलांडे २२ वर्ष  यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.

दोन्ही प्रकरणांमध्ये कलम २२३ भारतीय न्याय संहिता तसेच कलम ३८ व १३६ महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. या दोन कारवायांमध्ये एकूण २६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय आर. राठोड यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, पोलीस उपनिरीक्षक उत्तम कुमरे, पोलीस हवालदार नरेश कोडापे, नरेंद्र वाकडे, पोलीस अंमलदार दिलीप आदे, शंकर बोरसरे, प्रकाश चिकराम, गणेश आदे आणि अरविंद मेश्राम यांनी केले.

गणेश विसर्जन मिरवणुका व आगामी सार्वजनिक उत्सव शांततेत पार पडावेत, यासाठी गणेश मंडळे, आयोजक तसेच डीजे मालक व ऑपरेटर यांनी ध्वनीक्षेपणासंदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, आवश्यक वैध परवानगी घ्यावी आणि निर्धारित ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करू नये, असे आवाहन मुल पोलिसांनी केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.





  Print






Related Photos